पुणे : देशासाठी, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ अनेक जण व्यक्त करतात, मात्र प्रत्यक्षात काही करण्याची वेळ आली की तुमच्या-आमच्यापैकी अनेकांचे हात मागेच सरसावतात. पुण्यातील एका शिक्षिकेनं भारतीय जवानांसाठी काहीतरी 'खास' करण्याचा पण उचलला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी आपले दागिने त्या मोडणार आहेत.


सियाचीन... समुद्रसपाटीपासून तब्बल 22 हजार फूट उंचावर असेलली जगातील सर्वात अवघड युद्धभूमी. बरेचदा लष्कराचे जवान ऑक्सिजनच्या कमतरेमुळे या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच सियाचीनमध्ये आता सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निश्चय पुण्यातील शिक्षिकेने केला आहे.

आपले दागिने मोडून सुमेधा चिथडे यांनी या उदात्त कार्याचा शुभारंभ केला आहे. केवळ दागिने मोडून याचा खर्च भागणार नाही.
कारण येणारा खर्च हा एक कोटी रुपयांच्या घरात जाणारा आहे.

सुमेधा यांनी 1999 पासून सैनिकांसाठी आपले पती योगेश यांच्यासह एक संस्था सुरु केली आहे. ज्यात लष्करासाठी विविध कामं केली जातात. या दाम्पत्यानं जवानांसाठी काहीतरी करण्याचा वसा घेतला. त्यांना गरज आहे ती अनेक हातांची.

आपले प्राण वाचवणाऱ्या जवानांना आपणही प्राणवायू दिला तर दुसरे भाग्य ते काय असेल !!