Pune Crime News: दहावी शिक्षण असलेल्या भामट्यांनी नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेकांची एक कोटी ते 100 कोटी रुपयांपर्यंत कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. आरोपी फेसबुकवर कर्जाच्या आकर्षक पोस्ट आणि जाहिराती टाकून कर्ज हवे असलेल्या लोकांना आमिष दाखवत होते. याप्रकरणी महिला व्यवस्थापक राधिका यतिश आंबेकर, संदीप रामचंद्र समुद्रे आणि जयजित रामास गुप्ता असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
जलाराम एंटरप्रायझेस प्रायव्हेट फंड या कंपनीमार्फत कर्ज देऊ करून ही फसवणूक करण्यात आली होती. संबंधित कंपनी आरोपी संदीप समुद्रे चालवत होता. आरोपींकडून 13 संगणक, 7 मोबाईल फोन आणि कर्जाची काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. फिर्यादी श्रीराम प्रल्हाद पिंगळे यांनी फेसबुकवर जलाराम कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज देत असल्याची जाहिरातीची पोस्ट पाहिली. पिंगळे यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेतली. अधिक माहितीसाठी तक्रारदाराला बाणेर येथील जलाराम एंटरप्रायजेस प्रायव्हेट फंड कंपनीत बोलावण्यात आले. एक कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल तर एखाद्याला पाच ते 11 लाख रुपये रोख द्यावे लागतील, जे सुरक्षा ठेव म्हणून ठेवले जातील, असं त्यांनी सांगितलं. मात्र यात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने तक्रारदाराने हिंजवडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी याची खातरजमा केली असता आरोपी जी कंपनी चालवत होता ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झालं.
पोलिसांनी बाणेर येथील जलाराम कंपनीत जाऊन चौकशी केली असता तेथे सात महिला काम करत असल्याचे समोर आले. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संबंधित कंपनीची नोंदणी झाली नसल्याचंही समोर आले. त्यानंतर पोलिसांनी राधिका या महिला व्यवस्थापकाला अटक केली. अधिक तपास केला असता संबंधित कंपनी संदीप समुद्र चालवत असून जयजित गुप्ता हे मालक आहेत. आरोपींचे शिक्षण 10 वी पर्यंतही झालेले नाही तरीदेखील त्यांनी 1 ते 100 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष त्यांनी दाखविले आहे. नागरिकांनी अशा आकर्षक जाहिरातींना बळी पडू नये. पैसे गुंतवताना खात्री करा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.