पुणे : पुण्यात (Pune News) झिका व्हायरसचा  (Zika Virus) आणखी एक रुग्ण आढळून आलाय. पुण्यातील मुंढवा भागातील एका 47 वर्षीय महिलेचा रक्त चाचणीचा अहवाल  पॉझिटिव्ह आला आहे. या आधी पुण्यातील एरंडवणे भागातील एक डॉक्टर आणि त्यांची मुलगी झिका पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पुण्यात झीकाचा धोका वाढताना दिसतोय. डासांपासून हा आजार पसरतोय. ऐन वारीच्या तोंडावर  झिकाचे तीन रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न अनुत्तरीत आहे. 


 पुण्यात (Pune) झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय.  पावसाळा असल्याने अनेक आजार डोकं वर काढत असतानाच पुण्यात याचे दोन रुग्ण आढळले आहेत. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. झिकाचा प्रसार हा एडिस एजिप्ती डासापासून होतो. पुण्यात आतापर्यंत जेव्हा जेव्हा रुग्ण सापडले तेव्हा त्यांनी कुठे ना कुठे प्रवास केला होता किंवा  ते कोणाच्या तरी संपर्कात आले होते. मात्र आता सापडलेले रुग्णाच्या संसर्गाची साखळी अद्याप सापडलेली नाही. संसर्गाचे मूळच शोधले नाही तर संसर्गाचा धोका अधिक असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. 


झिकाचा लैंगिक संबधातून देखील प्रसार 


पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना झिका रुग्ण आढळलेल्या भागात योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश जारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.   झिका व्हायरस हा डासाने चावा घेतल्याने तर होतो. मात्र या व्हायरसचा लैंगिक संबधातून देखील प्रसार होतो.. त्यामुळे जर लक्षण आढळली तर शारीरिक संबंध ठेवू नका आणि गरोदर महिला असेल तर शेवटच्या तीन महिन्यात जास्त काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे बाळाच्या मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता  आहे.  


ज्ञानोबा आणि तुकोबाच्या पालख्या 1 जुलैला पुण्यात 


वारीच्या तोंडावर तीन रुग्ण आढळल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.   संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवारी 30 जूनला शहरात दाखल होणार आहेत. 30 जून आणि 1 जुलैला दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यात  झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता वाढवली आहे.  


Video :



हे ही वाचा :


Zika Virus : गरोदर महिलांनो काळजी घ्या! 'झिका' व्हायरस ठरतोय धोकादायक, काय काळजी घ्याल? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...