पिंपरी-चिंचवड : पुण्यातल्या कुरळी भागातील यात्रेत फटाकेबाजीमध्ये युवक पेटल्याची घटना समोर आली आहे. बल्या डोंगरे हा तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.


ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा चाकणलगतच्या कुरळी गावात सुरु आहे. या निमित्ताने गावकरी रात्री अकरा वाजता मुख्य चौकात फटाक्यांची आतषबाजी करत होते. तेव्हा अचानक एका फटाक्याचा स्फोट झाला.

शेजारी असलेल्या इतर फटाक्यांच्या वातीने पेट घेतला, ते फटाके जमलेल्या गर्दीत फुटू लागले. या प्रकारामुळे नागरिक सैरावैरा धावू लागले आणि एकच गोंधळ उडाला.

बल्याच्या अंगावर एक फटाका फुटला आणि त्याच्या कपड्याला आग लागली. गावकरी बल्याच्या मदतीला धावले. मात्र आग विझेपर्यंत बल्याला गंभीर इजा पोहचली होती. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

फटाके वाजवताना काळजी घेण्याचं आवाहन नेहमीच केलं जातं. पण प्रत्यक्षात फटाके फोडताना या आवाहनाकडे कानाडोळा केला जात असल्याने अशा घटना घडतात.

ही फटाकेबाजी रात्री दहानंतर करण्यात आल्याने ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार चाकण पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.