पुणे: मुंबईत छेडछाडीतून सुटका करण्यासाठी मुलीने इमारतीवरून उडी मारल्याची घटना ताजी असताना, पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे.
रहाटणी येथे गुरुवारच्या मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास अत्याचारातून स्वतःचा बचाव करण्यासाठी, 30 वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारली. यामध्ये पीडिताचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर डाव्या हाताची बोटांना इजा झाली.
पतीने पोलीस चौकीत बोलावले आहे, असा संदेश घेऊन अज्ञात नराधमाने मध्यरात्री घराचे दार ठोठावले. घरात दोन्ही मुलं झोपलेली असल्याने, तुम्ही पुढं जा. असं पीडितीने म्हणताच, त्या नराधमाणे थेट घरात प्रवेश करत आतून दाराची कडी लावली. त्यानंतर त्याने अतिप्रसंग सुरु केला.
त्यावेळी त्याच्या तावडीतून सुटका करुन, पीडित महिलेने बेडरुमच्या बाल्कनीतून थेट खाली उडी मारली. पहिल्या मजल्यावरून त्या खाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर पडल्या. जखमी अवस्थेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीस उठवून घडला प्रकार त्यांना सांगितला. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.