Pune Breaking News LIVE Updates : येरवडा परिसरातील इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू

स्लॅबसाठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

abp majha web team Last Updated: 04 Feb 2022 08:41 AM
दुर्घटनेतील मृत कामगारांना अजित पवार यांची श्रद्धांजली ; मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या  दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत

पुण्यातील दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश  मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत. इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. 

पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून कामगार मृत्यू प्रकरणी येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल

ब्लू ग्रास बिजनेस पार्क कन्स्ट्रक्शन साईटचे अनंता कंपनी,कॉन्ट्रॅक्टर अहलुवालीय कॉन्ट्रॅक्टर प्रा.लि कंपनीचे मालक मोहन अचलकर व बांधकाम संबंधित इतर पदाधिकारी ल,एमसीपीएल कंपनीचे लेबर सुपरवायजर शरीफ,सीएनब्ल्यू कंपनीचे सेफ्टी सुपरवायजर सतीश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  कामा दरम्यान कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो यांची माहित असताना त्याच्या कृतीमुळे फिर्यादी व त्याच्यासोबत असणारे कामगार गंभीर रित्या जखमी होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या मृतांची नावे सोहेल मोहम्मद वय 22,मोहम्मद समीर वय 30,मोबिद आलम वय 40,मजरूम हुसेन वय 35,तकाजी आलम वय 40
जखमींची नावे मोहम्मद आलम मो इब्राहीम,मोहम्मद फईम मो कुरवान,मोहम्मद रफिक आलम,मोहम्मद साहिल मो मुस्लिम
अजून अटक मात्र पोलिसांनी कोणालाही केली नाही. 

पंतप्रधानांचे ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पुण्यातील एका निर्माणाधीन इमारतीत दुर्घटनेने दुखावलो आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. मला आशा आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व लवकरात लवकर बरे होतील, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.





पार्श्वभूमी

Pune :  पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका अंडर-कन्स्ट्रक्शन मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली असून साईट वरती स्लॅब साठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

या साईटवर रात्री उशिरा देखील काम सुरूच होत घटना घडली तेंव्हा एकूण 10 मजूर तिथं काम करत होते त्यातील 5 जण या घटनेत मृत्युमुखी पडले असून उर्वरती 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या साऱ्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल होतं, सध्या मृत्यूंची ओळख पटवण्याचा काम पोलिस प्रशासन करत असून जखमींना ससून रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.

 

माञ या घटनेनंतर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत एवढ्या रात्री या साईटवर काम कसं काय चालू होतं? या मॉलच्या बांधकाम वेळेस सुरक्षतेची योग्य ती जबाबदारी घेतली आहे का? एवढ्या रात्री देखील काम सुरू करायला परमिशन नव्हती दिली कुणी?

या साऱ्या प्रश्नांसह या कामगारांची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे देखील महत्वाचं आहे.

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.