पुणे : साधारणतः माणसांमध्ये लठ्ठपणा किंवा वजन वाढल्यावर त्याच्यासाठी उपाय ऐकिवात आहेत. माणसं डाएट करतात आणि तरीही अतिरिक्त वजन कमी न झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून त्यावर लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. मात्र, पुणे येथे चक्क एका श्वानावर लठ्ठपणा वाढल्याने अशाच प्रकारची शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात केली गेली. माणसांवर लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रक्रिया ज्याला लॅप्रोस्कोपी स्लीव्ह गॅस्ट्राक्टमी असे संबोधिले जाते. गेल्या आठवड्यात ही शस्त्रक्रिया 8 वर्षाच्या दीपिका या श्वानावर करण्यात आली असून ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी तिचे वजन 50 किलो होते. भारतात प्रथमच अशा पद्धतीने श्वानावर अशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा संबंधित डॉक्टरांनी केला आहे.


पुण्याच्या पिंपळे सौदागर येथील अॅनिमल स्मॉल क्लिनिक येथे ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माणसांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करणारे डॉ. शशांक शाह यांनी मोठी मदत केली. ते स्वतः ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑपेरेशन थिएटरमध्ये उपस्थित होते. ही शस्त्रक्रिया साधारतः 2 ते अडीच तास इतकी काळ चालली असून ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी गेली 6 महिने अॅनिमल स्मॉल क्लिनिकचे 4 प्राण्यांचे डॉक्टर डॉ. शाह यांच्या संपर्कांत होते. अनेक शास्त्रीय गोष्टी त्यांनी डॉ. शाह यांच्याकडून जाणून घेतल्या.


2013 चा जन्म असलेल्या दीपिका या श्वानावर 4 वर्षांपूर्वी फॅमिली प्लॅनिंगची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, या शस्त्रक्रियेनंतर अचानक तिचे वजन वाढू लागले. पुण्याच्या कर्वेनगर येथे राहणाऱ्या या श्वानाचे मालक डेजी दारूवाला यांनी वजन वाढत असल्यामुळे तिला प्राण्यांचे डॉ. नरेंद्र परदेशी यांच्याकडे आणले. त्यानंतर त्यांनी काही व्यायाम आणि कसरती सांगितल्या. मात्र, या सगळ्या प्रकारानंतरही तिचे वजन सातत्याने वाढतच होते. त्यानंतर चार महिन्यांनी डॉक्टरांनी तिच्या रक्ताचे नमुने घेऊन काही चाचण्या केल्या. त्यामध्ये दीपिकाची थायरॉईड चाचणी पॉजिटीव्ह आली. डॉक्टरांनी तिच्यावर त्याच्या गोळ्या चालू केल्या. दिवसाला 100 एमजीच्या 11 गोळ्या देण्यात आल्या. मात्र, तरी तिचे वजन कमी होत नव्हते. गेल्या तीन वर्षाच्या काळात तिच्या सर्व चाचण्या आणि औषधे झाल्यानंतर तिच्या वजनात काही फरक पडत नव्हता. त्यामुळे डॉ. परदेशी यांनी माणसांचा लठ्ठपणा शस्त्रक्रियेद्वारे कमी करणारे डॉ. शशांक शाह यानां संपर्क केला. त्यानंतर 6-8 महिन्याच्या चर्चेनंतर तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.




याप्रकरणी डॉ. नरेंद्र परदेशी यांनी सांगितले की, "माणसांसारखे प्राण्यांमध्येही वजन वाढते याला विविध कारणे आहेत. विशेष करून या दीपिकाच्या केसमध्ये थायरॉईड हे मोठे कारण होते. काहीही व्यायाम, औषधे आणि आहार नियंत्रित करून वजन कमी होत नव्हते. तिचे वजन 50 किलोवर गेले होते. खरं तर तिचे वजन 16-18 किलो असणे अपेक्षित होते. त्यामुळे दीपिकाला चालता येत नव्हते. मोठ्या प्रमाणात लाळ तोंडातून गळत होती. त्याचा परिणाम थेट तिच्या हृदय, किडनी आणि लिव्हरवर होत होता. त्यामुळे आम्ही ह्या शस्त्रक्रियेबाबत  तिच्या मालकांना सांगितले आणि त्यांनी होकार दिल्यानंतर आम्ही तिला शस्त्रक्रियेसाठी घेतले. शस्त्रक्रियेच्या आठवडाभर तिला लिक्वेड डाएटवर ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तिला पहिले तीन दिवस चिकन सूपवर ठेवण्यात आले होते. तिला हळूहळू आहार चालू करणार आहोत. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. शशांक शाह स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये आले होते. त्याचप्रमाणे ही शस्त्रक्रिया करण्यात ज्योती परदेशी, रीना हरिभट, ऋतुजा काकडे, राधिका शाह यांचाही सहभाग होता. शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यात दीपिकाचे 5 किलो वजन कमी झाले आहे. मेडिकल जर्नल्समध्ये श्वानावर अशा प्रकारची कुठली शस्त्रक्रिया केल्याचे दिसत नाही. या शस्त्रक्रियेनंतर तिचा आहार नियंत्रित होण्यास मदत होणार आहे. कारण या शस्त्रक्रियेत तिचे निम्यापेक्षा अर्धे पोट स्टेपलच्या साहाय्याने नियंत्रित केले गेले आहे. त्यामुळे कदाचित भारतात अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया असण्याची शक्यता आहे." 


ते पुढे असेही म्हणाले की, "या शस्त्रक्रियेत भूल देणे हे मोठे जिकिरीचे काम असते. आमच्या या हॉस्पिटमध्ये अत्याधुनिक भुलीचे तंत्रज्ञान वापरले जाते." त्याचप्रमाणे गेली 20 वर्षे माणसांवर ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. शशांक शाह यांनी सांगितले की, "ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी खूप वेळा शास्त्रीय आणि वैद्यकीय चर्चा करण्यात आली. जी शस्त्रक्रिया आम्ही माणसांवर करतो ती शस्त्रक्रिया श्वानावर करणे ते जास्त अवघड होते. कारण त्यांची शरीर रचना ही वेगळी असते. त्यामुळे व्यस्थित सगळे प्लॅन केल्यांनतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या तरी तिचे चांगले परिणाम दिसत आहेत."