Pune- solapur accident :  पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात चांगलीच (Pune Accident News)  वाढ झाली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स बस काल रात्री पलटी झाली. यात 11 ते 12 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दौंड तालुक्यातील भांडगावजवळ हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे 50 ते 60 जण प्रवस करत होते. ही बस मुंबईहून तेलंगणाला निघाली होती.


पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. या अपघातात 11ते 12 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर यवत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.


राहुल गंगाधर तरटे (रा. नर्सीग रोड नांदेड), कु.नेहारिका नागनाथ हांडे, शंकुतला दिंगबर वाळके, कु.साक्षी नागनाथ हांडे (रा.देहु आळंदी पुणे), विग्नेश रमेश गकुला (रा.उमरगा जि. धाराधीव), पुष्पराज हनुमंतराव पाटील, ऐरना जठार गुमेरला (रा.चेंगल ता.विमगल जि.निजामबाद), सौ. माणिकेम मुतीराज जकाला, मुनीराज मुताबा जकाला (रा.तळोजा काॅम्पलेक्स नवी मुंबई), सौ. सुलोचना कृष्णा रेड्डी अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावं आहेत. 


ढाब्याजवळ थांबली अन् घात झाला...


पुण्याहून सोलापूरकडे जाणारी बस ढाब्यात जेवायला थांबली होती. जेवण केल्यानंतर प्रवासी बसमध्ये परतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यावेळी गाडीचा ड्रायव्हर बदलला. दुसऱ्या ड्रायव्हरने बस चालवायला घेतली. त्यामुळे बस प्रचंड वेगात होती. यावेळी ड्रायव्हरचा बसवरुन ताबा सुटला आणि बस पलटली.


अपघात कधी थांबणार?


पुणे- सोलापूर मार्गावर अपघाताचं सत्र सुरुच आहे. मार्च महिन्यातदेखील या मार्गावर मोठा अपघात झाला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर तिघेजण गंभीर जखमी झाले होते. वैभव विठ्ठल जांभळे (वय -24, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) प्रतीक पप्पू गवळी (वय - 22 रा. मोशी ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं होती. 


अपघातात वाढ


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.