पुणे: पुणे शहरात काल (सोमवारी) अधिकृतपणे मॉन्सूनने दस्तक दिल्यानंतर दोन दिवस पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) शहरातील अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

हवामानाचा अंदाज काय ?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार 28 मे) आणि उद्या (गुरुवार 29 मे) रोजी पुणे आणि परिसरात कमाल व किमान तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील. आकाश ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शुक्रवारीही ढगाळ वातावरण

शुक्रवारी (30 मे) कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, त्या दिवशीसुद्धा आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हलक्या पावसाची शक्यता देखील कायम आहे.

मान्सून आज संपूर्ण राज्य व्यापणार

राज्यात मान्सूनने जोरदार प्रवेश करत सोमवारपासून मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस केला. मंगळवारीही तो याच भागांमध्ये ठाण मांडून होता. आता आजपासून(बुधवार 28 मे) मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

कोकणात मुसळधार, अन्य भागांत पावसाचा जोर कमी

मंगळवारी ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यातील कोकण वगळता इतर भागांतील पावसाचा जोर 30 ते 31 मेपासून कमी होईल, असे हवामान विभागाने सांगितले. विशेषतः आजपासून (बुधवार 28 मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरू लागेल. या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, असे प्रशासनाने आवाहन केलं आहे. मात्र जिल्ह्यात सध्या पावसाने उसंती घेतली आहे.

मुंबई-पालघरमध्येही पावसात काहीशी उसंत

बुधवारपासून मुंबई आणि पालघर भागातील पावसाचा जोर कमी होईल. मात्र, कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मान्सूनची प्रगती वेगात

नैऋत्य मान्सून सोमवारी एकाच दिवशी मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत दाखल झाला. मंगळवारीही तो याच भागांत स्थिर होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्र, उर्वरित महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या भागांत प्रगती करणार आहे.

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी

पुणेकरांसाठी आणि महत्वाचं म्हणजे वीकेंड प्लान करणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी 29 मे रोजी सिंहगड किल्ला बंद राहणार आहे. पावसाळा सूरू झाला की, हजारोंच्या संख्येने ट्रेकर्स आणि पर्यटक सिंहगड किल्यावर येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने एक दिवस पाहणी दौरा आखला आहे. राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 29 मे गुरुवारला आपत्ती निवारण शासकिय दौरा होणार आहे. त्यासाठी सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे.  ट्रेकिंगला येणाऱ्यांना बंदी आणि कल्याण दरवाजा, अतकरवाडी तसंच पायी प्रवेश करायला बंदी घातली आहे.