पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या (Vaishnavi Hagawane death) प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार असताना ज्या थारमध्ये बसून फिरत होते. त्या गाडीच्या मालकाबाबतची माहिती समोर आली आहे. त्या गाडीचा मालक संकेत नरेश चोंधे असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान संकेतची थार गाडी आणि त्याचा भाऊ सुयशची क्रेटा गाडी जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संकेत नरेश चोंधे याच्यावरही वहिनीचा छळ केल्याचा आरोप आहे. संकेत हा यापूर्वी याच प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधेचा लहान भाऊ आहे. वीस लाख हुंड्यासाठी सुयशच्या पत्नीचा छळ केला. तिनं त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्याचबरोबर या त्रासानंतर तिनं महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. चोंधे कुटुंबीयांकडून छळ होत असल्याच्या तक्रारीनंतर बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र चोंधे परिवाराच्या एकाही सदस्याला या प्रकरणात अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे या हगवणे पितापुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्ये ही अशाच पध्दतीने महिलांचा छळ होतो का असा प्रश्न आहे. (Vaishnavi Hagawane death)
सासूकडून काळ्या जादूचा प्रयोग अन्
वैष्णवी हगवणे प्रकरण समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासामध्ये आत्तापर्यंत हगवणेंना मदत करणाऱ्यांमधील आरोपी हे घरात अशाच पध्दतीने महिलांचा छळ करत असल्याची संतापजन माहिती समोर आली आहे. दरम्यान आपला शारिरीक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार सुयश चौंधे याच्या पत्नीने केली आहे. नवरा सुयश चौंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगामध्ये तक्रार केली होती. मात्र त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. चौंधे कुटुंबावर आरोप करणाऱ्या त्यांच्या सूनेने त्रासाला कंटाळू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. चौंधे कुटुंबातील सूनेने त्यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. आपली सासू काळी जादू करते असा आरोप सूनेने केला आहे. लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळं सोनंही दिलं होतं. परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो असं सूनेने तक्रारीत म्हटलं आहे.
नवऱ्याकडून अश्लील व्हिडीओ दाखवून छळ
तर नवरा सुयश चौंधे हा अश्लील व्हिडीओ दाखवून दाखवून शरीर संबंध ठेवण्यासाठी त्रास द्यायता. तर नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे असं त्या सूनेने म्हटलंय. आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
चोंधे बंधूंकडे बावधन पोलिसांची चौकशी सुरू
वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मदत करणाऱ्या चोंधे बंधूंकडे बावधन पोलिसांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सुयश चोंधे याच्यावर पत्नीच्या तक्रारीवरून मंगळवारी (दि. 27) रात्री अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. बरेच दिवस हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. दरम्यान, सुयश चोंधे याचा भाऊ संकेत चोंधे (रा. भुगाव, ता. मुळशी) याने त्यांना मदत केल्याचे समोर आले. त्यांनी या दोघांना फिरायला थार कार दिली होती. पोलिसांनी ही थार कार जप्त केली आहे.
चोंधे बंधूची चौकशी सुरू असताना सुयश याच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. सुयश याने फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी तिने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार, सुयशवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. बावधन पोलिसांनी सुयश चोंधे याला नोटीस दिली आहे. सुयस चोंधे याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तसेच, महिला आयोगाकडेही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे.