पुणे : मतदानासाठी वेगवेगळ्या प्रकारची जनजागृती ( Pune loksabha  Election 2024) केली जाते. त्यात अनेकदा मतदान करावं यासाठी पक्षाकडून वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. मात्र पुण्यात वाढत्या उन्हाळ्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदारांना  निम्म्या किमतीत 'पॉट आईस्क्रीम'चा कप देण्यात येणार आहे. शिरीष ट्रेडर्स' चे संस्थापक शिरीष बोधनी यांनी  ही माहिती  दिली आहे. पुणेकरांसाठी खास ऑफर दिली आहे. मतदान करा आणि भर उन्हात आईस्क्रिम खाण्याचा आनंद लुटता येणार आहे. 


पुण्यात प्रसिद्ध असलेले लाकडी पॉटमध्ये केलेले आईस्क्रीम हे उन्हाळ्यात आकर्षण असते. कमला नेहरू पार्क दत्त मंदिराजवळ  (प्रभात रस्ता) येथे शिरीष बोधनी हा व्यवसाय करतात.त्यांचे पॉट आइसक्रीम 40 वर्षाहून अधिक काळ प्रसिद्ध आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी आणि लोकशाहीचे कर्तव्य बजावणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,यासाठी सोमवार,13 मेरोजी मतदानाच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 या कालावधीत मतदान करून आलेल्या मतदाराला आईस्क्रीम कप निम्म्या किमतीत दिला जाणार आहे.


दुपारी उन्हे वाढायच्या आत मतदारांनी मतदान करावे ,यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे,असे शिरीष बोधनी यांनी सांगितले. एरवी हे आईस्क्रीम 60 रुपयांना दिले जाते,मतदानाच्या दिवशी ते निम्म्या किमतीत म्हणजे 30 रुपयांना दिले जाणार आहे. 


'पॉट आईस्क्रीम'ची लज्जत


पुण्यातील उन्हाळ्याला अनेक दशकांपासून स्पॉट आईस्क्रीमने लज्जत मिळवून दिली आहे. वाड्यामध्ये सहकुटुंब पॉट फिरवून, बर्फ , मीठ टाकून, स्वतःच्या मेहनतीचे आईस्क्रीम तयार करणाऱ्या पुणेकरांना थेट घरोघरी आईस्क्रीम पुरवण्याची सेवा शिरीष बोधनी यांनी अनेक दशकांपूर्वी सुरू केली होती. त्यांच्या बरोबरचे पॉट आईस्क्रीम व्यवसायिक थांबले तरी बोधनी यांनी या उन्हाळ्यात देखील पॉट आईस्क्रीम पुणेकरांच्या साठी उपलब्ध केले आहे.निव्वळ दूध आणि अस्सल फ्लेवर त्यामुळे पॉट आईस्क्रीम पुण्यात नावाजले जाते. यामध्ये कोणतीही भेसळ नसते आणि ते कृत्रिम पदार्थ टाकून अधिक लज्जतदार केले जात नाही. आईस्क्रीमचा मूळ स्वाद टिकून राहण्यासाठी आईसक्रीमची प्रक्रिया पुणेकरांच्या पसंतीसही उतरली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या