पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे (Velhe Taluka) नवे नाव राजगड (Rajgad) असं देण्यात आलं आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला होता. वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने नाव बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.
पुणे (Pune) जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यामध्ये (Velhe Taluka) राजगड (Rajgad), तोरणासारखे मोठे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची ही मागणी होती. आता ही मागणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे.
वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानंतर आता राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता देखील मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचे राजपत्र जारी होणार आहे.