Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना पत्र लिहून पीएच.डी., पदव्युत्तर अभ्यासक्रमांची फी वाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. वसतिगृहे 11 जुलैपर्यंत फी वाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने याबाबत पत्र देत असा इशारा दिला आहे.  त्यामुळे विद्यार्थी आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.
 


विद्यार्थी दलित पँथर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युक्रांद, भारतीय विद्यार्थी मोर्चा अशा विविध विद्यार्थी संघटनांसह अन्य संघटनांकडून शुल्कात सूट देण्याची मागणी होत आहे. बहुतेक विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आणि कमी उत्पन्न गटातून येतात. त्यामुळे कोविड महामारीतून अर्थव्यवस्था अजून सावरली नसताना विविध अभ्यासक्रम आणि वसतिगृह सुविधांसाठी शुल्क वाढ करणे समर्थनीय नाही, अशी माहिती युक्रांदचे कमलाकर शेटे यांनी दिली आहे.


Phdच्या फी वाढीचा आढावा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने नेमली समिती
विद्यार्थी अभ्यासकांनी पीएचडी फी वाढीच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) पीएचडी फी वाढीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीच्या सूचनेनुसार शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला जाईल.


विद्यापीठाने 2019 मध्ये शुल्काची पुनर्रचना केली, ज्यामध्ये प्रवेश शुल्क आणि अभ्यासक्रम शुल्क वाढविण्यात आले. त्यानंतर फी जवळपास दुप्पट झाली. कोरोनानंतर विद्यापीठाने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थी अभ्यासकांनी या दरवाढीला विरोध करत ही फी वाढ अवाजवी असल्याचे सांगत आपली फी कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे फी वाढीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमण्याचा निर्णय घेतला.


विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन फी वाढीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांना अहवाल देणार आहे. त्यानंतर फीमध्ये सूट मिळू शकते, असं पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितलं.