पुणे: राज्यात महानगरपालिकांचं बिगुल वाजल्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुण्यात बैठका, युती, जागावाटप, चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच पुण्याच्या राजकीय वर्तुळात दोन राष्ट्रवादी (NCP) एकत्र आल्यांनतर पहिली बैठक पार पडली. जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी (MVA) म्हणून नाही तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढन्याची तयारी सध्या सुरु आहे. शरद पवार गटाने अजित पवार गटाकडे ४०-४५ जागा मागितल्याची माहिती आहे.  मात्र एवढ्या जागा न देता ३० जागा देण्याची तयारी अजित पवार (NCP Ajit Pawar) गटाने दर्शवल्याच समजतंय. स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली आहे, मात्र या संदर्भातला अंतिम निर्णय आहे तो सुप्रिया सुळे आणि अजित पवार घेणार आहेत. या बैठकीला शरद पवार गटाकडून अंकुश काकडे, वंदना चव्हाण, अश्विनी कदम तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि काही स्थानिक नेते उपस्थित होते. रात्री १२ च्या सुमारास ही बैठक पार पडल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

NCP Pune:  दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसचे जागा वाटपाच्या चर्चा सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याबरोबर काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत बैठक झाली. त्यामध्ये काही जागांवर निर्णय झाला. पण काही जागांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेसचे जागा वाटपाच्या चर्चा सुरूच आहेत. येत्या एक ते दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

NCP Pune: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही

पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र शहर पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. तिन्ही पक्षांची बैठक काल (बुधवारी) झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने माजी खासदार अॅड. वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, आमदार बापू पठारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, रवींद्र माळवदकर, प्रकाश म्हस्के, अजित पवार गटाच्या वतीने शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, तर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उपस्थित होते.

Continues below advertisement

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शहर पातळीवरील नेत्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीमध्ये संभाव्य आघाडीबाबत आणि जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये काही जागांवर निर्णय झाला. पण काही जागांवर तोडगा निघाला नाही. येत्या एक ते दोन दिवसांत जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.

NCP Pune: प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याने पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीला हादरा

राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. मात्र त्याआधीच पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी 22 डिसेंबर रोजी त्यांच्या पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केल्याची चर्चा होती. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या संभाव्य युतीला प्रशांत जगताप यांनी दर्शवलेला तीव्र विरोध त्यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. तसेच दोन दिवसात आपण राजीनाम्याचा निर्णय घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर मंगळवारी आणि आज असे दोन दिवस प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर अखेर आज शहराध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

एका पराभवामुळे भीती बाळगणारा मी नाही. विधानसभेत मी हरलो पण मला तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रती मला आदर आणि मान असल्याचे जगताप यावेळी म्हणाले. पार्टी कशी निवडणूक लढवेल याची मी तयारी केली होती. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यथित झाला होता. माझ्या मनात विचारांची घालमेल होती. पण घालमेल माझ्या आयुष्यावर उलटल्याचे प्रशांत जगताप म्हणाले. सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सगळे प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन आणि सगळ्या नेत्यांचा मान ठेऊन मी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहे. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही असेही त्यांनी सांगितले. मी राजीनामा शशिकांत शिंदे यांना मेल केला आहे. नगरसेवक पदाची निवडणूक मी लढवणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.