पुणे : किरकोळ वादावादीतून मुलांनी ढकलल्यामुळे झालेला पतीचा मृत्यू लपवण्यासाठी आपण मृतदेह घराच्या अंगणातच जाळला, असा बनाव रचणाऱ्या महिलेचं पितळ उघडं पडलं आहे. विद्या कांबळे यांनीच पती निलेशची साडीने गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील वडगाव शिंदे गावात ही धक्कादायक घटना घडली.

निलेश कांबळे यांच्या दारुच्या व्यसनाला पत्नी विद्या कांबळे वैतागल्या होत्या. रोजची भांडणं एकदाच काय ती संपवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि पती निलेशची साडीनं गळा आवळून हत्या केली.

विद्या इथवरच थांबल्या नाहीत. त्यांनी पती निलेश यांचा मृतदेह घराच्या अंगणातच जाळला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी मुलांना या हत्या प्रकरणात ओढत बनाव रचला. जेवण वाढण्यावरुन झालेल्या वादानंतर मुलांनी ढकलल्याने पतीचा मृत्यू झाल्याचं विद्या यांनी सांगितलं.

निलेशच्या भावाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आणि सर्व बनाव समोर आला. दारुचं व्यसन संसाराला वादाची किनार लावतं, दारु आयुष्याची दोरी कापते, हेच या घटनेनं अधोरेखित होतं. पण पत्नीने कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचं समर्थन होऊ शकत नाही, हेही तितकच खरं.