पुणेअग्निशमन दलाच्या जवानांनी (Pune fire) आतापर्यंत अनेकांना जीवनदान दिलं आहे. त्यात पुण्यातील अनेक घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी निर्भिडपणे कामगिरी केल्याचं बघितलं आहे. अशाच एका घटनेत पुन्हा एकदा अग्निशमन दलाच्या जवानांनी लहान मुलीचा जीव वाचवला आहे. काल रात्री बाराच्या सुमारात कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागली होती. या आगील लहान मुलगी अडकली होती. सर्वतोपरी प्रयत्न करुन अग्निशमन  दलाच्या जवानांनी मुलीला सुखरुप सोडवलं. कात्रज परिसरातील नॅन्सी लेक होम या 11 मजली इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आग लागली होती. हे पाहताच जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला आणि त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का? याची खात्री करत असताना एक लहान मुलगी खिडकीमधील लोखंडी ग्रीलमधे अडकल्याने वाचवण्याकरिता आरडाओरडा करीत होती. राजलक्ष्मी सुकरे असं या 9 वर्षीय मुलीचं नाव आहे. 



त्याचवेळी जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन बी ए सेट तसेच हायड्रोलिक कटर, दोराचा वापर करत खिडकीजवळ शिडी लावून त्याचवेळी काही जवानांनी शेजारील इमारतीच्या गच्चीवरुन मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.  अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नाला यश येऊन आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. तसंच इमारतीला लागलेली आग वीस मिनिटात नियंत्रणात आली. या आगीत घराचं मोठं नुकसान झालं असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. 


अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी


पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.


इतर महत्वाची बातमी-


Manipur Violence : मणिपूर हत्याकांड प्रकरण: सीबीआयने पुण्यातून मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या