Koregaon Bhima : भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी (Koregaon Bhima) विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. यंदा कोरोना निर्बंध नसल्याने 1 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे 10 ते 12 लाख भीम अनुयायी उपस्थित राहतील असा अंदाज आहे. त्यामुळे पुणे-अहमदनगर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी 1 जानेवारीला वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे.
कोणत्या मार्गावरील वाहतुकीत बदल-
-शिक्रापूर ते चाकण अशी जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
-अहमदनगरकडून पुणे, मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रोड मार्गे पुण्याकडे येतील.
-पुण्याहून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने ही पुणे- सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, अहमदनगर रोड अशी जातील.
-मुंबईकडून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक(ट्रक/टेम्पो) ही वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील.
-तसेच हलकी वाहने कार, जीप आदी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगरकडे जातील.
हवेली तालुक्यातील मौजे पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्यावेळी नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले आहे.
परिसरात दारु विक्रीला बंदी
एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या कालावधीत भीमा कोरेगाव आणि त्या परिसरातली गावात मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील शिक्रापूरसोबतच लोणीकंद पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये असणारे देशी, विदेशी दारू, वाईन, बिअर, ताडी यासह मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद राहणार आहेत. हद्दीमध्ये असणारे देशी, विदेशी दारू, वाईन, बिअर, ताडी यासह मद्यविक्रीची दुकाने राहणार बंद राहणार आहेत. या बंदीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.