Vande Bharat Sleeper नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी अतिशय जलद आणि सुख सुविधांनी संपन्न अशी वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. या वंदे भारतला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने देशात 100 पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन धावत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरसाठी हुबळी ते पुणे ही नवी वंदे भारत ट्रेन सुरू केली आहे. त्यामुळे, कोल्हापूरकरांना आता पुणे प्रवास सहज-सोपा झाला आहे. तसेच, पुणेकरांनाही कोल्हापूरला जलदगतीने जायला मिळणार आहे. देशातील पहिली वंदे भारत मुंबई-सोलापूर रेल्वे मार्गावर महाराष्ट्रात धावली. आता, पहिली वंदे भारत स्लीपर (Vande Bharat) ट्रेनही महाराष्ट्रातून धावणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पुण्यातून (Pune) ही ट्रेन धावणार असल्याचे संकेतच केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांनी दिले आहेत. 

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच वंदे भारत स्लीपर प्रोटोटाईप ट्रेनने प्रवास करत ट्रेनची चाचणी केली. यावेळी, या ट्रेनचा स्पीड, ट्रेनमधील सुविधांची माहिती देत पुढील तीन ते 4 महिन्यात पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणार असल्याचे सांगितले होते. आता, मुरलीधर मोहळ यांनी पहिली वंदे भारत स्लीपर कोणत्या मार्गावर धावणार, याचे संकेत दिले आहेत. पुणे ते दिल्ली रेल्वे मार्गावर ही पहिली ट्रेन धावणार असल्याची शक्यता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसच्या व्हर्च्युअल लोकार्पण सोहळ्यावेळी ते पुण्यातून बोलत होते. आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे तशी मागणी केली असून लवकरच ती ट्रेन सुरू होईल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. पुणे ते दिल्ली हे रेल्वे रुळावरील अंतर 1400 किमीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, लांब पल्ल्याच्या मार्गासाठी पुणे ते दिल्ली ही वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रवाशांच्या सेवेत सुरू होऊ शकते. 

वंदे भारत स्लीपरचा फर्स्ट लूक समोर

देशात पहिली वंदे भारत ट्रेन मुंबई ते सोलापूर या मार्गावर महाराष्ट्रात धावली. त्यानंतर, वंदे भारत ट्रेनचा सुरू असलेला पल्ला वाढत असून देशभरात आता 102 वंदे भारत ट्रेन धावत आहेत. या गाड्यांमधून तब्बल 3 कोटींहून अधिक लोकांनी प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेन ह्या सर्वप्रथम 15 फेब्रुवारी 2019 रोजी मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या देशात 100 हून अधिक वंदे भारत धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील 280 हून अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत. आता, आनंदाची बाब म्हणजे वंदे भारत ट्रेनची स्लीपर आता लवकरच रेल्वे मार्गावर धावणार आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्लीपर वंदे भारत ट्रेनची पाहणी केली होती.

पहिली वंदे भारत मेट्रो अहमदाबाद ते भूज

देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातच्या भुज पासून अहमदाबादपर्यंत चालवली जाणार आहे. या मध्ये अंजार, गाधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमतीला थांबेल. अहमदाबादहून निघालेली वंदे भारत मेट्रो साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रांगध्रा, हलवद, समखियाली, भचाऊ, गांधीधाम अंजार मार्गे भुजला पोहोचेल.

हेही वाचा

जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च