Pune TET Exam Scam : गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीच प्रकरण हे राज्यभर गाजत आहे.TET पेपर फुटीप्रकरण असेल किंवा आरोग्य भरती पेपर फुटीच प्रकरण असेल पुणे पोलीस आता साऱ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणत आरोपींना अटक करताना दिसत आहेत. आज पुणे सायबर पोलिसांनी टीइटी प्रकरणातील 3955 पानाचं दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. टीईटी प्रकरणात आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक केली असून सुशील खोडवेकर ,प्रितेश देशमुख , तुकाराम सुपे , सुखदेव ढेरे यांचा समावेश आहे. तर याच प्रकरणातील 12 आरोपी अजून फरार आहेत. त्यांचाही शोध पुणे पोलीस घेत आहेत. यातील दोषारोपपत्र आज दाखल केला असून राहिलेल्या आरोपींना अटक केल्यानंतर या दोषारोपपत्रात अजून वाढ होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



दोन दिवसांपुर्वी 2019 साली झालेल्या टी. ई. टी. अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होतं.  महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावर कारवाईदेखील होणार असल्याचं सांगितलं होतं. 2019 ला 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टी ई टी परिक्षा दिली होती.त्यापैकी 7800 विद्यार्थ्यां पैसै देऊन परिक्षा पास झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे आता राज्यातील वेगवेगळ्या शहरात आणि गावात बोगस पद्धतीने भरती होऊन नोकरी करणार्‍या शिक्षकांचं धाबं दणाणलं आहे.



म्हाडा परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप एमपीएससी समन्वय समितीने केला होता. या प्रकरणाचा तपास करुन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली होती. याबाबत समितीने पुणे सायबर पोलिसांना पत्र सुद्धा लिहिलं होतं. शिवाय परीक्षा केंद्रावर घडलेल्या गैरप्रकाराचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आणलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ईडी करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे