पुणे: पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये एका प्रवासी 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून शारीरिक संबंध वेळ हा वैद्यकीयरीत्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, पीडितेने दिलेल्या जबाबानुसार जबरदस्ती करणे, संभोग करणे अशक्य वाटते. यावरून असं सिद्ध होतं की, पीडिता व आरोपी यांच्यात जे काही संबंध झाले ते संमतीनेच झालेत आणि संमतीने झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही, असे जामीन अर्जात वकिलांनी म्हटले आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट बस स्थानकात दि. 25 फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतलं. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. गाडेचे वकील वाजिद खान-बिडकर यांनी दत्ता गाडेच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. पीडितेने फिर्यादीमध्ये म्हटले की, पीडितेच्या बाजूस एक वयस्कर व्यक्ती बसली होती. ती त्याच बसने प्रवास करणार होती. ती व्यक्ती पीडितेसोबत आणि आरोपीसोबत का गेली नाही? यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होते.

स्वारगेट येथे सीसीटीव्ही कॅमेरे असून, हे फुटेज दाखल केलेले नाही. यावरून आरोपीने गैरकायदेशीर कृती केलेली नाही, हे सिद्ध होतं. फलटणला जाण्यासाठी सकाळी 5 वाजल्यापासून एका एका तासाला बस आहेत. फिर्यादी ही वेळोवेळी गावी (फलटण) जात असे आणि म्हणून दर तासाला फलटणसाठी गाडी आहे, हे माहिती असून देखील फिर्यादी अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे, असंही जामीन अर्जात नमूद करण्यात आलेलं आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर डेपोमध्येच असलेल्या शिवशाही बसमध्ये 25 फेब्रुवारीच्या पहाटे बलात्काराची घटना घडली होती. पुण्यामधून फलटणच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या तरुणीवर बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलीस शोध घेत होते. या घटनेनंतर राज्यात खळबळ माजली होती.तर या प्रकरणातील आरोपी शिरूर तालुक्यातील त्याच्या गावातील एका ऊसाच्या शेतात लपून बसला होता. हा आरोपी स्वत:ला कंडक्टर भासवून पीडित महिलेला ताई म्हणून तिचा विश्वास मिळवला होता. आरोपीनेच ती बस दाखवली होती तसेच बसमध्ये अनेक लोक असल्याचं त्यानं भासवलं होतं. मात्र, बस पूर्णपणे रिकामी होती.

फिर्यादी तरूणीने बसमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. मला बाहेर सोडा, अशीही विनंती तिने केली होती. मात्र, आरोपीने तिला मारहाण करून जबरदस्तीने तिच्यावर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला आहे. यानंतर तो पळून गेला. पीडितेने नंतर मित्राच्या सांगण्यावरून फिर्याद दिली आणि गुन्हा दाखल केला.हा आरोपी अत्यंत सराईत आहे. तो मोबाईल बंद करून फिरत होता. आजवर त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.