Sassoon Hospital Corruption Case: पुण्यातील ससून रुग्णालय वारंवार होत असलेल्या गैरप्रकारांसाठी चर्चेत येत. अशातच पुन्हा एका गैरप्रकारामुळे ससून रूग्णालयाची चर्चा होऊ लागली आहे. या रुग्णालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे रंगेहाथ पकडल्यानं खळबळ उडाली आहे. यापूर्वी ड्रग्ज प्रकरणामुळं, ललित पाटील पळून गेल्यानं, पोर्शे कार अपघातातील रक्ताचे नमुने बदलल्याने ससून रुग्णालय चर्चेत आलं होतं.

Continues below advertisement

नेमंक काय आहे प्रकरण?

⁠ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एसीबीनं मोठी कारवाई केली आहे. ⁠बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एक लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं आहे. महाविद्यालयाच्या फर्निचर पुरवठादाराकडे या अधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. याची माहिती लाचलुचपत विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला आणि या दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडलं. महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या फर्निचर पुरवठादाराचे दहा लाख रुपयांचे बील काढण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाच मागितली होती. ⁠

दरम्यान, यापूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटील याच ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पुण्यातील गाजलेल्या पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने याच ससून रुग्णालयात बदलण्यात आले होते. यानंतर आता इथल्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याप्रकरणी पुन्हा एकदा बी. जे. मेडिकल कॉलेज चर्चेत आलं आहे.

Continues below advertisement

गंभीर गुन्ह्यातील आरोपी ससून रुग्णालयातून पळाला

पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष सचिन साठे असं ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचे नाव होते. आरोपी साठे याच्याविरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये 354 अन्वे गुन्हा दाखल आहे. साठे याच्यावर सध्या पुण्याच्या असून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना पोलिसांचा देखदेखीखाली असलेला साठे ससून रुग्णालयातून पळाला, याप्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

याआधी पळालेला ललित पाटील

ड्रग्स माफिया ललित (Pune Crime News) पाटील 2023 मध्ये पुण्यातील ससूनमधून पळून गेला होता. त्यानंतर देखील पुणे पोलिस आणि प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले होते, या प्रकरणी कारवाई देखील झाली होती. तरीदेखील आरोपी पळून जाणं सुरूच असल्याचं दिसत आहे.  आता देखील पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असताना गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळाला असल्याची  माहिती समोर आली आहे. याआधी देखील या ठिकाणी उपचार सुरू असणारे आरोपी पळून गेल्याची माहिती आहे. 

पुण्यासह कोल्हापूरचे पश्चिम महाराष्ट्रातले कुख्यात गुन्हेगार येरवाडा कारागृहात ठेवले जातात. त्यांना वैद्यकीय तक्रारी असतील तर त्यांच्यावर ससून रूग्णालयात उपचार केले जातात. पण या सुविधेचा गुन्हेगार गैरवापर करत असल्याच आढळून आलं आहे. या ठिकाणी उपचार सुरू असताना तो पळून गेल्याची माहिती आहे.