Pune Sinhagad Fort News: किल्ले सिंहगडावर दरड कोसळल्याची घटना. आज सकाळी घाट रस्त्यावर एका वळणावर कोसळले दगड. सिंहगड किल्ल्यावरील 28 कॉर्नर म्हणजेच जगताप माचीच्या वरील भागातील दरड कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलीही वाहतूक सुरु नव्हती. अतिवृषटीमुळे सिंहगड किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली होती. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. त्या पत्राला मान्यता देत आजपासून 16 जुलैपर्यंत सिंहगड अतिवृष्टीमुळे बंद ठेवण्यात आला आहे.
घाट परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आम्ही अधिक स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे, विशेषत: वीकेंडला जेव्हा हजारो पर्यटक असतात. या व्यतिरिक्त, प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही या स्थानांवर अतिरिक्त सावधगिरीची चिन्हे ठेवत आहोत. किल्ल्याकडे जाणार्या घाट विभागात किमान आठ ठिकाणी खडक पडण्याची शक्यता आहे.दरवर्षी अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना जीव गमवावा लागतो. काही दिवसांपुर्वीच कल्याण दरवाज्याजवळ दरड कोसळली होती. त्यात एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे.
गर्दी नियंत्रणासाठी 25 वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र अनेकांना नियंत्रणात ठेवण्यात त्यांना त्रास होत आहे. सेल्फी घेण्यासाठी लोक धोकादायक ठिकाणी उभे असतात. त्यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. पर्यटकांनी देखील स्वत:ची सुरक्षा बाळगायला हवी. गर्दी करु नये, सतर्कता बाळगायला हवी, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. पुण्यात पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे अति पावसाची शक्यता आहे. काल दुपारच्या सुमारास कात्रज बोगद्यातदेखील दरड कोसळली होती. त्यामुळे काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. मात्र काही वेळानंतर वाहतुक सुरळीत सुरु करण्यात आली होती.