Pune Osho News: गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूंच्या समाधीचे दर्शन मिळावे म्हणून देशातील विविध ठिकाणाहून अनुयायी आले होते.  मात्र या आश्रमाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. तसेच आश्रमात अनुयायांना प्रवेश नाकारला. त्यामुळे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर आंदोलन केले. अनेक अनुयायांनी संतापदेखील व्यक्त केला होता.


ओशो यांचा जन्म व मृत्यचे स्थळ, समाधी भारतात आहे. त्यांनी सर्वाधिक काळ भारतात घालवला. मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार मात्र पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचे मुख्यालय नेण्यात आले असून, सगळ्या गोष्टींचा लाभही तिथेच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोहचू न देता अनुयायींवरही अनेक बंधने लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातो. 


भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमाला त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावर आपले वर्चस्व दाखवत आहेत. आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व ओशोंचे विचार संपविण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप ओशो अनुयायांनी केला आहे.


ओशो हे भारताची संपदा आहेत. त्यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे म्हणून ते कायम म्हणत की, अगदी वाजवी दरात हे उपलब्ध करून द्या. आता मात्र त्यांच्या प्रत्येक साहित्यावर विदेशी लोक आपला हक्क सांगत हे साहित्य जगात पोहचविण्यात अडचणी निर्माण करत आहेत. झुरीच येथून प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण होत आहे. या सर्व मालमत्तेचा, बौद्धिक संपदेच्या उत्पन्नाचा एकही वाटा भारताकडे येत नसल्याने येथील आश्रमांना व्यवस्थापनाच्या खर्चाचा प्रश्न पडतो. आणि त्यावर तोडगा म्हणून येथील जागा परस्पर बेकायदेशीररित्या विकण्यात येते यावर आमचा आक्षेप आहे, असं स्वामी चैतन्य कीर्ती म्हणाले. 


माळा घालू नये या बंधनाचा आग्रह धरत आज माळधारक अनुयायींना समाधीचे दर्शन घेऊ देण्यात आले नाही. दर्शन घ्यायचे असेल, तर माळ काढावी लागेल अशी सक्ती करण्यात आल्याचेही यावेळी अनुयायींनी  सांगितले. आत प्रवेश नाकारला गेल्याने आश्रमाच्या प्रवेशद्वारा बाहेर चार तास भर पावसात आंदोलन करण्यात आले.