पुणे: शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांचा गैरसमज लवकरच दूर होईल, ते पुन्हा शिवसेनेत परततील अशी आशा शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. मी भगवद्गितेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे, त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करायचा नाही असंही त्या म्हणाल्या. त्या पुण्यामध्ये बोलत होत्या. 


शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "आम्ही आधीपासून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आलो आहोत. पण आता राजकारणाचा प्रांत वाढला आहे, कारण त्यात मोठे वादविवाद सुरू आहे. जे लोक आपल्यामधून काही कारणाने दूर गेले आहेत त्यांचे गैरसमज नक्कीच दूर होतील आणि आपल्या नदीचा परत प्रवाह वाहेल याची मला खात्री आहे."
 
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्या सरकारला ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी त्यांनी तो करावा. पण यात कायदा नक्की काय सांगतो हे सर्वोच्च न्यायालय स्पष्ट करेल. नामांतरांसारखे विषय हे लोकांच्या मनात रुजलेले आहेत. त्यामुळे अशावेळी अल्पमत, बहुमताचा विचार करायचा नसतो. 


येत्या 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती आम्ही करणार आहोत असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 


ठाकरे शिंदे एकमेकांना भेटणार; दीपाली सय्यद यांचे ट्वीट
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्वीट केलं आहे.  या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल भाजपचे धन्यवाद देखील दिपाली सय्यद यांनी मानले आहेत. दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.