पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या मागण्या आणि विविध कारनाम्यांनी चर्चेत आलेली ट्रेनी आयएएस डॉ. पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar) आणि तिचे कुटुंबीय यांच्या अडचणी आता वाढणार असल्याचं चित्र आहे. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवरती पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याबद्दल आयएएस अधिकारी पुजा खेडकरची आई मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधी या शेतकऱ्यांची दखल घेण्यास नकार देणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांनी एबीपी माझाने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर मनोरमा खेडकरवरती गुन्हा दाखल केला आहे. आज पौड पोलिस जिथे हा संपुर्ण प्रकार घडला त्या धडवली गावातील पासलकर आणि मरगळे कुटुंबीयांच्या शेतात जाऊन तपास सुरू करणार आहेत. त्यानंतर मनोरमा खेडकरवरील कारवाईला सुरुवात होणार आहे.


पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) हिच्या कारनाम्यानंतर आता तिचं संपूर्ण खेडकर कुटुंबीय चर्चेत आलं होतं. पूजाची आई मनोरमा खेडकरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचं दिसून आलं होतं. व्हायरल व्हिडीओमध्ये मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर मनोरमा खेडकरची दादागिरी व्हिडीओत रेकॉर्ड झाली आहे. शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरचा प्रयत्न असल्याचं व्हिडीओत दिसून आलं होतं. ही घटना समोर आल्यानंतर एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.


काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये? 


पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली आहे. जमीन खरेदी करताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar) आईने म्हणजेच मनोरमा खेडकर बाऊन्सर घेऊन तिथ पोहचली आणि तिने हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं. या प्रकरणानंतर शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, दबाव आल्यानं शेतकऱ्यांची तक्रारही नोंदवली गेली नाही. त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


एबीपीच्या वृत्तानंतर पोलिसांनी घेतली दखल


व्हायरल व्हिडिओनंतर आणि एबीपीने दाखवलेल्या वृत्तानंतर आता पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरवरती गुन्हा दाखल केला आहे. आज पौड पोलिस जिथे हा संपुर्ण प्रकार घडला त्या धडवली गावातील पासलकर आणि मरगळे कुटुंबीयांच्या शेतात जाऊन तपास सुरू करणार आहेत. त्यानंतर मनोरमा खेडकरवरील कारवाईला सुरुवात होईल अशी माहिती समोर आली आहे.