पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजलं जाणाऱ्या पुणे (Pune) शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली गुन्हेगारी पाहता, क्राईम कॅपिटल म्हणून पुण्याचा उल्लेख केला जातो. हत्या, दहशत, अपघात, महिलांवरील अत्याचार, चोरी आणि दरोड्याच्या घटनांनी पुणे शहर हादरुन जात आहे. पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई देखील करण्यात येते. मात्र, पोलिसांच्या कारवाईवर समाधान होत नसल्याचे दिसून येते. कारण, पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाहीत. त्यातच, आता पुण्यातील एका ज्वेलर्स (gold) दुकानातून दिवसाढवळ्या 20 ते 25 तोळे सोनं लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी चक्क प्लॅस्टीकच्या बंदुकीचा (gun) धाक दाखवून हा दरोडा टाकल्याचेही प्रथमदर्शनी तपासातून समोर आले आहे. 

पुणे शहरातील धायरी भागात असलेल्या श्री ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी काही वेळापूर्वी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विष्णू दहीवाळ यांच्या मालकीचे हे दुकान असून दरोडोखोरांनी त्यांच्याकडील पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील 20 ते 25 तोळे सोने लुटुन नेल्याचा प्रकार घडला आहे. सध्याच्या बाजारभावाचा विचार केल्यास 20 ते 25 लाख रुपयांचे सोनं लुटल्याचा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तुल हे खेळण्यातील असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पळून गेलेल्या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

सोनं हा अतिशय मौल्यवान दागिना आहे. त्यातच, गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर गगनाला भिडले असून आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत प्रतितोळा 5 हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात भुवया उंचावणारी वाढ झाल्याने सोनं खरेदी करणंही कठीण बनलं आहे. त्यातच, सोन्याचे दागिने चोरीचे, चैन स्नॅचिंगचेही प्रकार वाढले आहेत. दुसरीकडे सोन्याच्या दुकानावर दरोडे टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे पुण्यातील या घटनेवरुन दिसून येत आहे.

हेही वाचा 

'त्या' हॉस्पिटलचे लायसन्स रद्द करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश; आरोपींचा जामीनही फेटाळला