Pune Accident News : पुण्यातील (Pune) शिवाजी नगरजवळ सकाळी ट्रक अचानक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात अडकला. त्यामुळे सकाळी ऑफिसच्यावेळी पुणेकरांना वाहतूक कोंडीचा (Pune accident) सामना करावा लागला. हा ट्रक खडी वाहूत नेत होता. खडी बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि मजूरांना वेळ लागला. त्यामुळे पुणेकर बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकले होते.
विद्यापीठाकडून शिवाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कायम मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. सकाळी ऑफिसच्या वेळी अनेकांना या वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागतो. परिणामी ऑफिसमध्ये पुणेकर वेळेत पोहोचू शकत नाही. शिवाय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने देखील वाहतूक संथ गतीने असते. पाणी जाणारे चेंबर्सदेखील खोल असल्याने खोलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे किरकोळ अपघात होत असतात.
खड्ड्यांच्या तक्रारींवर दुर्लक्ष
पावसाळा सुरु होण्यापूर्वी शहरातील सगळे खड्डे बुजवणार, अशी पुणेकरांना अपेक्षा होती. मात्र खड्डे बुजवण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केलं. शहरात खड्ड्यांवरुन राजकारण पेटलं होतं. अनेकदा विरोधी पक्षाने आंदोलनं देखील केली. पुणेकरांनी देखील अनेकदा तक्रारी केल्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. शहरात स्वारगेट, हडपसर, कर्वे रोड, शिवाजी नगर, फर्ग्यूसन रोड, विश्रांतवाडी, कात्रज, धनकवडी या परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याच परिसरातील नागरिकांनी खड्डे बुजवण्यासाठी वेगवेगळी निदर्शने केली मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्याचं चित्र आहे.
विद्यापीठासमोरील पूल पाडल्याने मोठी वाहतूक कोंडी
कोरोना लॉकडाऊनमध्ये विद्यापीठासमोरील पूल मेट्रोच्या कामासाठी अडथळा होत असल्याने पाडण्यात आला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या पुलाचं काम सुरु करण्यात येणार होतं. मात्र दोन वर्ष उलटून गेली तरीदेखील त्या पुलाचं काम सुरु झालं नाही. त्यामुळे शिवाजी नगर ते विद्यापीठ चौक आणि औंध ते विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात रोज वाहतूक कोंडी होते. या मार्गावरील दुसऱ्या पूलाचा आराखडा तयार आहे. मात्र नवा पूल तयार व्हायला 2025 उजाडणार असल्याचं सांगण्यात आहे.
पुण्यातील खड्ड्याला ठेकेदार जबाबदार
निकृष्ट कामामुळे आतापर्यंत केवळ तीन कंत्राटदारांनी पुणे महापालिकेला (PMC) 3.72 लाख रुपयांचा दंड भरला आहे. डिफेक्ट लायबिलिटी पीरियड (DLP) दरम्यान रस्त्यांवर खड्डे असतानाही कारवाईला अजून वेग आलेला नाही. 15 प्रभाग कार्यालयांपैकी नऊ वॉर्ड कार्यालयांनी DLP मधील 640 रस्त्यांची यादी पीएमसीला सादर केली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे असतानाही आतापर्यंत केवळ पाच रस्त्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी तीन कंत्राटदारांनी वसूल केलेला दंड जमा केला आहे.