2017-18 या आर्थिक वर्षात बजेटच्या 75.5 टक्के कर एकट्या पुणे विभागाने भरला आहे. 16 जानेवारीपर्यंत एकट्या पुणे विभागातून 37 हजार 310 कोटी रुपये प्रत्यक्ष कर म्हणून जमा करण्यात आले आहेत. मागील वर्षापेक्षा हा कर भरणा 23.98 टक्के इतका आहे.
चालू आर्थिक वर्षात देशभरातील कर भरण्यामध्ये पुणे विभागाचा वाटा 4.4 टक्क्यांनी वाढून 5.5 टक्क्यांवर पोहोचल्याचं ए सी शुक्ला यांनी सांगितलं. सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच विभागांमध्ये पुणे विभाग अव्वल ठरला आहे.
मुंबई आणि विदर्भातील 11 जिल्हे वगळून पुणे विभागात उर्वरित महाराष्ट्राचा समावेश होता. मुंबई आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांसाठी वेगळा कर क्षेत्र आहे.
याशिवाय पुणे विभागात अॅडवान्स टॅक्सच्या रुपात कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कर भरण्यातही वाढ झाली. मागील वर्षाच्या 8,052.20 कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा पुणे विभागात 9,846.16 कोटी रुपये कॉर्पोरेट टॅक्स जमा झाला आहे. ही वाढ 22.28 टक्के आहे.
तर आतापर्यंत या वर्षात 5,312.20 कोटी रुपये वैयक्तिक कराच्या स्वरुपात जमा झाले आहेत. मागील वर्षी वैयक्तिक कर 4,633.70 कोटी रुपये जमा झाला होता.
यंदा आयकर विभागाने 220 सर्वेक्षण केले होते. पुण्यात जाहीर न केलेलं सुमारे 500 कोटी रुपयांचं उत्पन्न असल्याचं सर्वेक्षणातून समोर आल्याचं शुक्ला यांनी सांगितलं.