Pune Red Alert पुणे आणि आजुबाजूच्या परिसरात हवामान खात्याने ( Red Alert) आज (20 जुलै) आणि उद्या (21 जुलै) रेड अलर्ट (Pune Weather forecast) जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घरातून बाहेर पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मात्र पुणे आणि आसपासच्या परिसरात हवा तेवढा पाऊस झाला नाही आहे. त्यामुळे शहराला पावसाची गरज आहे. चार धरणं मिळून फक्त 10 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. 


मागील दोन दिवसांपासून पुण्यात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुण्यातील अनेक परिसरात नागरिकांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. एकाच दिवसाच्या पावसाने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रत्येकाला काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


घाटमाथ्यावरील लोकांनी काळजी घ्या! 


पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे जिल्ह्यात 23 गावे दरडप्रवण आणि 84 पूरप्रवण गावे आहेत. दरडप्रवण गावात दरडी कोसळण्याची शक्यता तसेच पूरप्रवण भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. आपल्या भागात घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केलं आहे . 


मढे घाट 60 दिवस बंद


वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील 60 दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहे. हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये 200 ते 300 फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर भारतीय दंड. संहिता 1908 कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा-


Amravati Melghat : झाडाच्या आश्रय घ्यायला गेले अन् घात झाला; वीज पडून काका-पुतण्याचा मृत्यू, तर आठ जण जखमी