पुणे :  एक आठवड्याच्या ब्रेकनंतर पुण्याला आजपासून पुढील तीन दिवस यलो अलर्ट (Yellow Alert)  जारी केलाय. पुण्यात (Pune Weather Update)  हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पुण्यात 20 जून ते 23  जूनपर्यंत पावसाची शक्यता असून घाटमाथ्यावर पावसाचा जोर (Pune Rain News)  अधिक असेल. दरम्यान शेतकऱ्यांनी पुरेशा पावसाची वाट पाहून पेरणी करावी, असं आवाहन हवामान विभागाने केलंय. तसेच पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या पर्यटकांना इशारा दिला आहे.

  


पुणे जिल्ह्यात जूनमध्ये साधारण पावसाने सरासरी ओलांडली आहे. 76  टक्के अधिकचा पाऊस पडला आहे मात्र शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.  पावसाने मोठा ब्रेक घेतला असला तरीही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात प्रामुख्याने पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर राहणार आहे. 


राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिमझिम पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मुंबईसह पालघर, ठाणेरत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग  या भागात मुंबईच्या हवामान खात्यानं यलो अलर्ट जारी केलाय. विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.


गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने झोडपले


आठवड्याभरापासून पावसाचा  जोरही कमी झाला होता. मात्र, आता अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. पुढील चार दिवस किनारपट्टीसह पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात पुण्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते.  संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय.  पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं.   पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.  


हे ही वाचा :


राज्यात कधी पडणार मोठा पाऊस? पंजाबराव डखांनी सांगितली तारीख, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा