Pune Rain Update : मागील काही दिवसांपासून पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. अखेर पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा संपली आहे. पुण्यातील काही परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही परिसरात मुसळधार तर पावसाच्या हलक्या सरी सुरु आहे.  मागील काही दिवसांपासून पुण्यात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. सोबतच पुणे शहराजवळील ग्रामीण भागातदेखील शेतकरी पावसाकडे डोळा लावून बसले होते. अखेर या उकाड्यातून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 


वारजे, शिवणे परिसरात मुसळधार तर कात्रज, कोंढवा, कोथरुड, स्वारगेट, नांदेड सिटी , सातारा रोड, धायरी, सिंंहगड रोड परिसरात पावसाच्या सरी कोसळत आहे. आज (24 जून) मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर  25 आणि 26 जून रोजी शहर आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, उद्या (25 जून) आणि परवा (26 जून) दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


साधारणपणे, जूनमध्ये पुण्यात अंदाजे 100 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यावर्षी आतापर्यंत केवळ 20.7 मिमी पाऊस झाला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने उष्णतेची लाट आणि वाढलेले तापमान यामुळे रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी मुसळधार पावसामुळे कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे.


पुण्यात ऊन पावसाचा खेळ...


पुण्यात काही परिसरात मुसळधार तर काही परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील काही परिसरात हलक्या सरीचा पाऊस सुरु असून बाणेर, पाषाण परिसरात ऊन आहे. मात्र उद्या आणि परवा पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


Maharaharashtra Weather Update: मान्सूनसाठी तारीख पे तारीख...


हवामान विभागाने सुरुवातीला सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला. त्याचबरोबर मान्सून केरळात नेहमीप्रमाणेच 1 जूनला दाखल होईल असं सांगितलं. तर महाराष्ट्रात मान्सून 7 जूनला कोकणात पोहचेल आणि 9 जूनपर्यंत तो पुणे - मुंबईसह महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज व्यक्त केला. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सूनच्या आगमनाची 16 जून ही नवीन तारीख सांगण्यात आली. त्यामध्येही पुढे बदल झाला आणि मॉन्सूनच्या आगमनाची 23 जून ही नवीन तारीख सांगण्यात आली.  मात्र मान्सून तळकोकणात यायलाच 9 जून उजाडला.