Pune Rain: पुण्यातील पुरस्थिती आता ओसरली आहे. अनेक भागामध्ये पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. या भागात काल उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाहणी केली त्यांनतर आज खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Pati) यांनी पाहणी केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) पुण्यातील पुरस्थिती आणि नागरिकांचे हाल यामध्ये यत्रंणाची चूक आहे हे मान्य केलं आहे. 


खडकवासला धरणातून अचानकपणे विसर्ग वाढवण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील पाणी वाढलं त्याचा फटका अनेक सोसायट्या, घरे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. पाण्याचा विसर्ग वाढवल्याची पुर्वकल्पना दिली गेली नाही. याबाबत एबीपी माझाशी बोलताना खासदार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) म्हणाले, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार होता तर त्याची पुर्वकल्पना देणं फार महत्त्वाचं होतं. हा समन्वयाचा अभाव आहे. निश्चितच आम्ही त्याच्या खोलापर्यंत जाणार आहोत. यामध्ये कोणाची चूक असेल त्याला आम्ही सोडणार नाही, असंही ते पुढे म्हणालेत.


काल पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) खडकवासला धरण भरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचलं, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि रहिवाशांनी प्रशासनाने पुर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग वाढवला त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असा आरोप केला होता. त्यावर आज मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


खडकवासला धरणातून विसर्ग कमी



खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.


एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित



पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून  पोहोचवण्यात आलेलं नाही.तसेच  वापरण्यासाठी पाणी नाही.   या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत.


पुणे, पिंपरीतील शाळा, महाविद्यालयाना आज सुट्टी 


पुण्याला  हवामान विभागाने शुक्रवारी  आज  (ऑरेंज अलर्ट) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने शाळा आणि  महाविद्यालयांना  सुट्टी जाहीर केली.  भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आज  बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे अशा ही सूचना केल्या आहेत.