Pune Rain Update: राज्यातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसून येत आहे. पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात आज सकाळच्या पहाटेच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. तर आज पुणे, मुंबई, कोकण यासह घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यासह (Pune Rain Update) घाट माथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, इतर भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.


पुण्यात दोन (Pune Rain Update) दिवस पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून येत होतं. मात्र आज पुनहा एकदा सकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठा वाढला आहे. शहर परिसरातील सर्व धरणे भरल्याने वर्षभरातील पुणेकरांची पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे.


राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता



ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील आज यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विश्रांती घेतलेला पावसाचा जोर उद्यापासून पुन्हा वाढणार आहे. उद्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे (Pune Rain Update) या दोन जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवणार


मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 2460 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9 वा. 6051 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे. 


खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदी पात्रामध्ये विसर्ग वाढवणार



खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 11704 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी 9:00 वा. 13981 क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी अशी माहिती देण्यात आली आहे.