पुणे: पुणे शहर (Pune Rain) परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) विसर्ग वाढवण्यात आला. याचा परिणाम पुणे शहरातील अनेक भागात बसला आहे. त्यानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. त्यानंतर आता खडकवासल्यातून (Khadakwasla Dam) विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. तर संध्याकाळी ७ वाजण्याच्या आधी धरणातून विसर्ग करण्यात येईल धरण ५० टक्के रिकामं केलं जाईल, जेणेकरून रात्री पुन्हा पाऊस झाला तर धरण पुन्हा भरेल. त्यामुळे ४ वाजण्याच्या सुमारास विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती होती. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) ३५ ते ४० हजार क्युसेकने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही सोडण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे
पुणेकरांनी आधी जलसंपदा विभागाकडून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली नसल्याचा आरोप केला होता. अशातच आता देखील खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) ३५ ते ४० हजार क्युसेकने संध्याकाळी चार ते सहा या दोन तासांच्या कालावधीत कधीही सोडण्यात येईल असा मेसेज जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता गिरीजा फुटाणे यांनी दिला आहे. मात्र यामुळे पाणी नक्की कधी वाढेल याबाबत नागरिकांना नेमकी माहिती मिळत नाहिये. सध्या खडकवासला धरणातून २० हजार क्युसेकनेच विसर्ग करण्यात येतो आहे. तो सहा वाजेपर्यंत कधीही वाढवला जाऊ शकतो असं गिरीजा फुटाणे यांनी म्हटलं आहे.
विसर्ग वाढवल्यानंतर पुन्हा एकदा सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या, सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याच्या शक्यता आहेत. तर विसर्ग कधी वाढवणार याबाबत नक्की माहिती मिळत नसल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. तर अजित पवारांचा (Ajit Pawar) पाहणी दौरा केला असताना त्यांना देखील नागरिकांनी पाण्याचा प्रवाह वाढवल्याची विसर्ग सुरू केल्याची माहिती नव्हती अशी तक्रार दिली. आज सहा वाजता विसर्ग वाढवून ४० हजार क्युसेक करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १५००० क्युसेक विसर्ग वाढवून करून तो संध्याकाळी ६ वाजता ४०००० क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली आहे.
पुण्यात मुसळधार पावसाने नागरिकांचे हाल
पुणे महानगर पालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोड वरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
कोणते पूल बंद?
पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी पूल, मुळा नदी पूल, संगम रोड पूल, होळकर पूल, संगमवाडी पूल, महर्षी शिंदे पूल, हडपसर- मुंढवा रोड पूल, मातंग पूल, येरवडा शांतीनगर येथील पूल, निंबजनगर पूल, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.