पुणे: पुण्यात अद्याप पाऊस (Heavy Rain) सुरूच आहे. मात्र, धरणातील विसर्ग कमी केल्याने पुण्यातील अनेक भागातील पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. अजित पवार (Ajit Pawar) पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झाले. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा देखील केली. 


पुणे महानगरपालिका आपत्ती निवारण कक्षात अजित पवारांनी (Ajit Pawar) पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली तसेच योग्य त्या सूचना केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला. नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग करण्याच्या  सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पुरामुळे प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत.


 ४८ तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. लवासा येथे दरड कोसळल्याने मदत कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रशासन सतर्क राहून काम करीत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्याचा खर्च महानगरपालिका व शासनातर्फे करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. वेगवेगळ्या भागात एनडीआर एफच्या तुकड्या तैनात केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आंबील ओढा भागातही खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पाणी सोडायचं असेल तर आत्ताच काही प्रमाणात सोडा. रात्री उशिरा पाण्याचा विसर्ग सुरू करू नये अशा सूचना यावेळी दिल्या आहे. नदीत सोडणारे पाणी कॅनलमध्ये  सोडण्यात येईल त्यामुळे खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे. ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात, कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. 


पुरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. मुळशी धरण भरले आहे. त्या ठिकाणी वीज निर्मीती करावी अशा सूचना दिल्या आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर परिसरात बचावकार्य करण्यात आले आहे. लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आहेत. पुर परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तातडीने बचावकार्य केले जाईल त्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. 


पुढील दोन दिवस पर्यटनस्थळी जाऊ नका, घराबाहेर पडू नका, काळजी घ्या असे आवाहन अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. लष्कराचे १०० जवान तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.


पुणे शहर परिसरात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे आपत्ती निवारण विभागासमोर मोठी आव्हाने येत आहेत. खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरलं आहे. मात्र, पाणी ओसरणं हे तात्पुरतं ठरू शकतं असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितलंं आहे. पाऊस सुरू आहे त्यामुळे विसर्ग वाढवला तर पुन्हा पाण्याचा प्रवाह वाढू शकतो. पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याबाबत कोणत्या उपाययोजन करता येतील त्याबाबत बैठक सुरू आहे. या बैठकीला पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), पालिका आयुक्त यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.