पुणे : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील रेल्वे स्थानकावर अनेकदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित व्हायचा. त्यासोबतच प्रवाशांना महागडं पाणी विकत घ्यावं लागत होतं. अनेक प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच आता पुणे रेल्वे प्रशासनाकडून पुण्यातील रेल्वे स्थानकावर वॉटर व्हेंडिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना फक्त पाच रुपयात एक लीटर पाणी मिळणार आहे.
वॉटर व्हेंडिंग सेवेचा पुनःश्च हरिओम...
पुणे विभागाकडून प्रवाश्यांची गैरसोय लक्षात घेता सुमारे वर्षभरापूर्वीच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र काही काळ चालल्यानंतर या वॉटर व्हेंडिंग मशीन पुन्हा बंद अवस्थेत होत्या. मात्र प्रवाशांची मागणी लक्षात घेत सततच्या पाठपुराव्यामुळे या मशीन पुन्हा सुरु करण्यात आल्या आहे. यासोबतच प्रवाश्यांना अवघ्या पाच रुपयांमध्ये आपली बॉटल रिफील करून घेता येणार आहे.
प्रवाश्यांचा मोठा प्रतिसाद
पुणे रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ बसवले गेले आहेत मात्र नळाभोवती असणाऱ्या अस्वच्छतेमुळे प्रवासी याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळत होते. आता या वॉटर व्हेंडिंग मशीनमुळे प्रवाशांच्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या या वॉटर व्हेंडिंग मशीन पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक वर ठेवण्यात आल्या आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत (AI) आता पुणे रेल्वे स्थानकावर लक्ष
आर्टिफिशियल इंटेलिजन्समार्फत (AI) आता पुणे रेल्वे स्थानकावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक 'इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेरे' बसवण्यात येणार आहेत. AI कॅमेरे परिसरात संशयास्पद हालचालींवर नजर ठेवतील. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास ते तात्काळ रेल्वे प्रशासनाला सतर्क करणार आहेत. आयओटी मार्फत ही सीस्टिम काम करणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही उपाययोजना करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं आपल्या कामात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सुरुवात केली आहे. यासंदर्भात प्रत्येक विभागाकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. पुणे विभागाने असे सात आराखडे मुख्यालयात सादर केले होते. त्याच्या दक्षता यंत्रणेच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा कडक करण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल दिसत आहे.
ही बातमी वाचा: