पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला कशी लागली आहे, याचा आणखी एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे. या प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप झाला होता. मात्र, आता हा धनिकपूत्र कायद्याच्या तावडीतून सहीसलामत सुटावा, यासाठी ससूनमधील वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोघांनी मुख्य आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचे उघड झाले आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Road Accident)


पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले आहे. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरु आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले जाईल. मात्र, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका धनाढ्य व्यक्तीच्या मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कशी नियम धाब्यावर बसवून काम करु शकते, हे या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


पोलिसांना आधीच संशय आल्याने दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट?


येरवाडा पोलिसांनी अपघात झाल्यानंतर या धनिकपुत्राच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीने त्याची ब्लड टेस्ट करणे अपेक्षित होते. मात्र, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी त्याला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आले. तोपर्यंत याप्रकरणाचा बराच बभ्रा झाला होता. याप्रकरणात धनिकपुत्राला मदत झाल्याच्या संशयाने पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली. हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडे पाठवण्यात आले. तसेच ससून आणि खासगी रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचा आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. 


आणखी वाचा


पार्टीला जातोय ना मग ती ग्रे पोर्शे घेऊन जा, मी दारु पितो, पप्पांनीच मला कार दिली; लेकानं पोलिसांना असं काही सांगितलं की विशाल अग्रवाल गोत्यात आले!