पुणे: काही दिवसांपूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणाबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत निवेदन दिले. पोर्शे अपघातप्रकरणात पोलिसांपासून ते ससूनमधील डॉक्टरांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते, तसेच यावरुन पोलीस खाते आणि गृहमंत्रालयावर जोरदार टीका झाली होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात पोर्शे अपघात (Pune Car Accident) प्रकरणावर निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पुणे अपघात प्रकरणातील अनेक नव्या गोष्टी उघड केल्या. 


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलावर काही अपवाद वगळता योग्यप्रकारे कारवाई केल्याचा दावा केला. बालहक्क न्यायालयाने संबंधित अल्पवयीन मुलाबाबत निर्णय दिल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाकडे एक अर्ज केला होता. अल्पवयीन मुलाने निर्घृणपणे हे कृत्य केले. त्याचे वय 17 वर्षे 8 महिने आहे. त्यामुळे बालहक्क न्यायालयाच्या कलम 20 नुसार त्याला सज्ञान समजून हे प्रकरण कोर्टाकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंती पोलिसांनी सुरुवातीलाच केल्याचे देवेंद्र फडणवीस स्पष्ट केले. निर्भया प्रकरणानंतर 17 वर्षांवरील व्यक्तीने थंड डोक्याने गुन्हेगारी कृत्य केल्यास त्याला सज्ञान म्हणून वागणूक देण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे पोलिसांनी पावले उचलत सत्र न्यायालयाकडे याचिका दाखल केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


मुलाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा 110 चा स्पीड होता; फडणवीसांची माहिती


पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसस  करण्यात आले. या अहवालात समोर आले की, ज्यावेळी अल्पवयीन मुलाने गाडीचा ब्रेक मारला, पोर्शे कार ज्या स्पीडला लॉक झाली तेव्हा गाडीचा वेग 110 KMPH इतका होता. त्यामुळे संबंधित मुलगा हा अत्यंत वेगाने गाडी चालवत होता, हे स्पष्ट झाले आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. अल्पवयीन मुलाच्या घरापासून तो बारमध्ये जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. त्याने ज्या बारमध्ये जाऊन दारु प्याली, तेथील सीसीव्ही फुटेज आणि बिलही जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्याकडे कायदेशीर आणि तांत्रिक पुराव्यांची कोणतीही कमतरता नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


मुलाचा अल्कोहोल रिपोर्ट नेगेटिव्ह आला अन् पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली: देवेंद्र फडणवीस


देवेंद्र फडणवीस यांनी ससून रुग्णालयात धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने कसे बदलण्यात आले, यावरही प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल आढळले नाही, असे दिसून आले तेव्हा पोलिसांना स्ट्राईक झालं काहीतरी गडबड आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले. हे डीएनएन नमुने  रक्ताच्या सॅम्पलशी मॅच करुन पाहिले तेव्हा अल्कोहोल टेस्टसाठी देण्यात आलेले रक्त वेगळ्या व्यक्तीचे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन ससूनमधील डॉक्टरांना अटक केली. त्यापैकी एका डॉक्टरने 3 लाख रुपये घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याची कबुली दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 


पोलिसांनी काय चुका केल्या, फडणवीसांनी दिली कबुली


पुणे पोर्शे अपघातप्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर  प्रचंड टीका झाली होती. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पोलिसांची पहिली चूक कुठे झाली तर अपघातानंतर मुलाला पहाटे 3 वाजता पोलीस ठाण्यात आणण्यात आले तेव्हा लगेच मेडिकलला पाठवायला पाहिजे होते. पण पोलिसांना त्यांनी सकाळी साडेआठला मेडिकलला पाठवले. नॉर्मली पोलीस अपघातानंतर 304 कलम लावतात, पण तेव्हा पोलिसांनी 304 अ कलम लावले. मात्र, नंतर वरिष्ठांनी 304 अ कलम लावले. त्याचा रेकॉर्ड केस डायरीत आहे. यावेळी आपले कर्तव्य न बजावणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


आणखी वाचा


मोठी बातमी : पोर्शे अपघातातील अल्पवयीन मुलाला तात्काळ मुक्त करा, हायकोर्टाचे आदेश


VIDEO: देवेंद्र फडणवीस पुणे पोर्शे अपघातप्रकरणाबाबत सभागृहात नेमकं काय बोलले?