Jagadish Mulik :  भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (jagdish mulik) यांचे भावी खासदार असे पोस्टर लावणाऱ्या आतिक शेख या तरुणाने दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचे हे बॅनर्स खासदार गिरीश बापट यांच्या निधानापूर्वीच लावले होते. मात्र त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं या तरुणाने म्हटलं आहे.


‘भावी खासदार जगदीश मुळीक’ (jagdish mulik) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत, पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीनच दिवस झाले असताना पुण्यातील मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली बॅनरबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे अनेकांनी टीका केली आहे तर अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं बोललं जात आहे. मात्र मुळीकांना भावी खासदार म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावणाऱ्या तरुणाने एबीपी माझाशी बोलताना जाहीर माफी मागितली आहे.


'खासदार गिरीश बापट यांच्या सल्ल्यानेच जगदीश मुळीक हे राजकारणात आले. त्यांनी आतापर्यंत बापटांच्या सल्ल्यानेच कामं केली. मात्र जगदीश मुळीक हे आमचे आवडते नेते आहे. याच वर्षी नाही तर दरवर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे आम्ही पोस्टर लावत असतो. त्याप्रमाणेच यावर्षीही हे पोस्टर लावले होते. यापूर्वी मंत्री म्हणून पोस्टर लावले होते आणि आता भावी खासदार म्हणून लावले होते. मात्र दुर्दैवाने खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं त्याच दिवशी हे पोस्टर हटवण्यातदेखील आले. या सगळ्यावरुन विरोधक केवळ राजकारण करत आहेत. त्यांनी अशा प्रकारचं राजकारण विरोधकांनी करु नये,असं त्या तरुणाने सांगितलं आहे.


राष्ट्रवादीकडून जोरदार टीका...


हे पोस्टर पाहून राष्ट्रवादीने भाजपचा चांगलाच समाचार घेतल्याचं बघायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते जितेद्र आव्हाड, विरोधीपक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या युवानेत्यांनी भाजपवर चांगलीच टीका केली. हाच का तुमचा वेगळेपणा म्हणत त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. 10 दिवसांचे सुतक तर संपू द्या मग लावा बॅनर, का तुम्ही वाटच बघत होतात…आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत. हाच का तुमचा वेगळेपणा... बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजून वाहत आहेत .. तोवरच तुम्ही बॅट पॅड घालून तयार,असंही आव्हाड यांनी ट्विट केलं. तर जरा माणुसकी राहू द्या एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. आपण 13 ते 14 दिवसांचा दुखवटा पाळतो. याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवावं, असं म्हणत अजित पवारांनी भाजपला चांगलंच खडसावलं.