पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी असलेला निलेश चव्हाण याने 2022 मध्ये पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, पुणे पोलीस आयुक्तालयाकडून तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर निलेश चव्हाणने मंत्रालयात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अपील केले होते अशी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी अहवाल सादर केला त्यामध्ये निलेश चव्हाणला 2019 मध्ये वारजे पोलीस ठाण्यात दाखल हाणामारीचा अदखलपात्र गुन्हा, 2019 मधील हिंजवडी पोलीस ठाण्यातील ड्रंक एन्ड ड्राइव्हचा अदखलपात्र गुन्हा आणि वारजे पोलीस ठाण्यात मे 2022 मध्ये दाखल पत्नीच्या छळवणुकीचा गुन्हा यांची माहिती दडवण्यात आली होती. अहवालात ती माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर मंत्रालयातून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्यात आला. त्यावेळी अमिताभ गुप्ता हे पुण्याचे पोलीस आयुक्त तर जालींदर सुपेकर हे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते.
निलेश चव्हाणवर अदखल पात्र आणि दखल पात्र गुन्हे
* 2009 : निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात हाणामारीच्या अदखल पात्रवर गुन्हा दाखल झाला.
*2021: मध्ये हिंजवडी पोलीस ठाण्यात निलेश चव्हाणवर ड्रंक एन्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला .
* मे 2022: मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दिली होती की, स्पाय कॅमेरा लावून तिचे व्हिडिओ काढण्यात आले होते. त्या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
* वरील गुन्हे दाखल असताना देखील नोव्हेंबर 2022 मधे तरीही निलेश चव्हाणला मंत्रालयातुन शस्त्रपरवाना देण्यात आला.
* मे 2025: वैष्णवी हगवणे यांच्या बाळाला स्वतःकडे ठेवून त्याची हेळसांड केल्याप्रकरणी आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर निलेशने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती, त्यामुळे निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल.
* मे 2025 निलेश चव्हाणला बावधन पोलीसांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सह आरोपी करुन गुन्हा दाखल केला.
निलेशच्या घरात पोलिसांना काय सापडलं?
निलेशच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल आणि पासपोर्ट या वस्तू जप्त केल्या. पोलिसांकडून निलेशची कसून चौकशी केली जाते आहे. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे मोबाईल निलेशच्या घरी आढळून आले. निलेश चव्हाणकडून याआधी 3 मोबाईल जप्त केले. शनिवारी आणखी 3 फोन जप्त केले. जप्त मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवण्यात आल्याची माहिती बावधनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.