पुणे : ललित पाटीलला अटक करताच पुणे पोलिसांच्या (Sasoon Hospital Drug Racket) तपासाला देखील वेग आला आहे. त्यातच ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि त्याच्या गॅंगवर आता पुणे पोलीस मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहे. पुढच्या आठवड्यात ललित पाटील आणि त्यांच्या टोळीवर पुणे पोलीस मकोका अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे. 


ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर पुणे, मुंबई, नाशिक आणि चाकण या चार शहरांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ड्रग्ज विक्रिसाठीच हे गुन्हे नोंद आहेत या सगळ्या प्रकरणात ललित पाटील याला त्याच्या साथीदाराने मोठी मदत केली आहे. त्यामुळे ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर संघटीत गुन्हेगारीच्या अंतर्गत कारवाई करण्याचा विचार पुणे पोलिसांकडून केला जात आहे. सोबतच पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्याची तयारीदेखील सुरु झाली आहे. येत्या सोमवारी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. 


या सगळ्यांना यापूर्वीदेखील काही गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र या सगळ्यांना लवकर जामीन मंजूर झाला आणि हे सगळे पुन्हा ड्रग्ज रॅकेट चालवण्यासाठी मोकळे झाले. मात्र या ड्रग्ज रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचं समोर आलं आहे. देशातच नाही देशाबाहेरदेखील ही टोळी काम करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणातील सगळ्या आरोपींवर मकोका लावण्यात येणार आहे. मकोका लावल्याने या गुन्हेगारांना जामीन मिळणं कठिण होणार आहे आमि परिणामी ड्रग्ज विक्रीच्या या रॅकेटवर मोठा आळा बसणार आहे. हे रॅकेट समाजासाठी किती घातक आहे हे पोलिसांना कोर्टात मांडणदेखील सोपं जाणार आहे. 


ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक 


ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावं आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Sasoon Hospital Drug Racket : चांगली संधी पुणे पोलिसांनी गमावली; ललित पाटीलचा पत्ता मुंबई पोलिसांना कसा सापडला ते ड्रग्ज रॅकेटचे गॉडफादर कोण?, संपूर्ण प्रकरण एका क्लिकवर...