पुणे : पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर सुरु असलेल्या कर्णबधिरांच्या मोर्चावर पुणे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. ज्यांना जन्मल्यापासून आवाज नाही अशांच्या भावना दाबण्याचा प्रकार पुणे पोलिसांनी केलाय. या लाठीचार्जमुळे समाजकल्याण आयुक्तालयासमोर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. कर्णबधिरांना शिक्षण रोजगार याच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.


VIDEO | पुण्यात कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार | पुणे | एबीपी माझा



आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी आज पुण्यात आले होते. आज सकाळपासून पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन सुरु होतं. याचवेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज करायला सुरुवात केली. पोलिसांच्या लाठीमारात काही युवकांना चांगलाच मार लागला आहे.

प्रशासनाकडे अनेकदा आपल्या मागण्या पोहोचवण्याचा प्रयत्न कर्णबधिर तरुण-तरुणींनी केला. मात्र, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष झालं. याच मागण्या सरकारनपर्यंत पुन्हा एकदा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं. जर तातडीने सरकारने काही पावलं उचलली नाहीत तर मुंबईकडे मोर्चा काढून चालत जाण्याचं त्यांनी ठरवलं. पण पोलिसांनी याला परवानगी दिली नाही. मात्र, तेव्हाही आमच्यावर अत्याचार झाल्याची भावना या कर्णबधिर तरुणांनी मांडलीय.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अत्यंत शांततेत मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीर तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. ही अत्यंत निंदनीय आणि लाजिरवाणी गोष्ट असून गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील कर्णबधीर तरुण तरुणींनी आपल्या काही मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालावर मोर्चा काढला होता. बोलूही न शकणारे हे तरुण अत्यंत शांतपणे आपल्या मागण्या घेऊन शासन दरबारी आले होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्याइतपत पोलिसांची मजल जातेच कशी? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

या राज्याला सक्षम गृहमंत्री असावा अशी आमची पाहिल्यापासूनची मागणी आहे आणि ते वारंवार खरे ठरत आहे. गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री पूर्णतः अयशस्वी ठरले असून त्यांनी आजच्या प्रकारानंतर तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी खरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची तडकाफडकी बदली 

अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आता बालाजी मंजूळे यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. कर्णबधिर आंदोलनकर्त्यांचा बालाजी मंजुळे विरोध होता.