पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी (Tanisha Bhishe Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आयुक्ताना ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. 

ससूनच्या अहवालामध्ये डॉ. घैसास यांनी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यावरुन आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तनिषा भिसे यांना चार तास ताटकळत ठेऊन त्यांच्यावर उपचार केला नाही. त्यामुळे पुढची परिस्थिती उद्भवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. डॉ. घैसास यांनी या प्रकरणी निष्काळजीपणा दाखवल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 

डॉक्टर सुश्रुत घैसास यांचेवर पोलिस योग्य ती कारवाई करतील असं पुणे पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले. या प्रकरणात डॉ. घैसास यांची भूमिका निष्पण झाली आहे. त्या आधारे हा गुन्हा दाखल केरण्यात आल्याचं पोलिस उपायुक्तांनी सांगितलं. 

Sasoon Hospital Report : ससूनचा अहवाल प्राप्त

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डिपॉझिटअभावी गरोदर महिलेला उपचार नाकारण्यात आले होते. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांची एक समिती नेमण्यात आली होती. 

उपचाराअभावी तनिषा भिसेंचा मृत्यू

गेल्या महिन्यात, 28  मार्चला दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनानं भिसे कुटुंबाकडून 10 लाखांची मागणी केली. त्याशिवाय उपचार करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. आधीच नाजूक अवस्थेत असलेल्या तनिषा यांचा 31 मार्चला दोन मुलींना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. जन्माला आलेली ती दोन मुलं आईला पोरकी झाली आणि आता भिसे कुटुंबही या सगळ्या प्रकरणात होरपळतंय. 

ही बातमी वाचा: