पुणे : पुण्यात 80 टक्के जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं. तरुणीच्या हातावरील नावावरुन पोलिसांनी मारेकरी प्रियकराला बेड्या ठोकल्या.


विमाननगर पोलिस ठाण्यात सकाळी सव्वादहा वाजता आलेल्या फोन कॉलने मोठी धावपळ उडाली. एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह निर्जन स्थळी सापडला होता. विमाननगर पोलिस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र 80 टक्के जळालेल्या तरुणीची ओळख पटवण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या.

पूर्ण शरीरावरील कातडी आणि चेहरा जळालेला असल्यामुळे ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. तरुणीचा केवळ एक हात जळालेला नव्हता आणि त्यावर नाव होतं अयोध्या. फेसबुकवर 'अयोध्या' नावाचा पोलिसांनी शोध घेतला. हातावर नाव असलेलं अकाऊंट पोलिसांनी शोधलं. फोटोवर तिचं नाव अयोध्या वैद्य असल्याचं समजलं.

अयोध्याचे अनैतिक संबंध असलेल्या तिच्या प्रियकारानेच काटा काढला होता. अयोध्याने त्याच्यामागे लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. तिच्या मागणीला वैतागून अखेर बालाजी धाकतोंडेने मित्राच्या मदतीने तिची हत्या केली. आधी अयोध्याला भोसकलं. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह पेटवून दिला.