पुणे: मागील दोन दिवसांपूर्वी अतिशय गंभीर घटना घडली होती. कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील महिलेची तक्रार खोटी तक्रार दाखल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, त्या घटनेने पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं बोललं जात होतं. शहरात महिला सुरक्षित नाहीत अशा प्रकारचे नॅरेटिव्ह पसरवण्याचे काही लोक प्रयत्न करत होते. त्यानंतर आम्ही 24 तासांच्या आत आम्ही सर्व समोर आणले. त्या महिलेने दिलेली तक्रार पूर्णपण खोटी आणि दिशाभूल करणारी होती. जेणेकरून माहिती लपवण्याचे प्रकार समोर आले होते. या घटनेमुळे पुणे शहराच्या चांगल्या प्रतिमेबाबचत कोणीही फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे प्रयत्न करू नका. पुणे शहर पोलिसदल पूर्णपणे कार्यक्षमतेने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे. जनतेच्या सहकार्याने आणि आपल्या सहभागाने पुढच्या काळात आणखी चांगलं कार्य करू असंही पुढे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. 

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर इशारा दिला आहे. खोटी अफवा पसरवणाऱ्याला सोडणार नाही. दोन दिवसांपूर्वी अत्यंत गंभीर तक्रार पोलिसांकडे आली. पुणे शहरात महिला सुरक्षित नसल्याचं खोटं पसरवण्यात आलं, असं म्हणत आयुक्तांनी इशारा दिला आहे.

कोंढवा प्रकरण नेमकं काय?

संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील (Pune Crime News) पीडितेने सांगितलेला ‘कुरिअर बॉय’ हा प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. काल (शुक्रवारी, ता 4) या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. त्याचबरोबर तरूणीने केलेले काही आरोप देखील खोटे असल्याचं समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झालेला नाही. त्याचबरोबर, तरुणीच्या मोबाइलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून, त्या खाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच एडीट करून लिहिल्याची कबुली दिली आहे, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. या घटनेनं खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये प्रकरण पुर्णपणे उलटं फिरल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे.(Pune Crime News)

पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाबाबत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण देखील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करतो. तो गेल्या वर्षभरापासून तरूणीच्या संपर्कामध्ये होता. दोघांची ओळख समाज मेळाव्यात झालेली होती. त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता. तो तिच्या घरी येत-जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे; तर तो अनेकदा तिच्या घरी ‘फूड डिलिव्हरी अ‍ॅप’वरून तिच्यासाठी खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता.

फोटो दाखवल्यानंतर तिने ओळख नाकारली

घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोसायटीत येताना दिसला आणि पावणेनऊच्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. पोलिसांनी त्याचा फोटो तिला दाखवला असता तरुणीने त्याला ओळखत नसल्याचे सांगितले होते. मात्र, ती काही वेळ स्तब्ध झाली. ‘तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला?’ असा प्रश्नही तिने पोलिसांना केला. ओळखत नाही, हे उत्तर देण्यापूर्वी एक ते दोन मिनिटे ती स्तब्ध झाली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. तांत्रिक तपासात स्पष्ट झाले, की आरोपी तरुण तिच्याच बोलावण्यावरून घरी आला होता.