पुणे : पालिका आयुक्तांच्या बगल्यातील वस्तू चोरीच्या प्रकरणी आंदोलन केलं म्हणून मनसे नेते अॅड. किशोर शिंदे आणि पदाधिकाऱ्यांवर BNSS 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अॅड. किशोर शिंदे आणि अन्य मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएमसी कार्यालयात झालेल्या राड्यानंतर ही अधिकृत तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती. महापालिकेच्या तक्रारीनुसार, सदर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकृत कामात अडथळा निर्माण केला होता. यामुळे पुणे पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहिताच्या 132व्या कलमाखाली कारवाई केली.
MNS Protest In PMC : मनसेचे आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन
आयुक्तांच्या निवासस्थानी 20 लाख रुपयांच्या ज्या वस्तू चोरीला गेल्य आहेत त्या वस्तू कुठे गेल्या याचा जाब विचारायला मनसे कार्यकर्ते आयुक्तांच्या दालनात गेले. त्यावेळी उत्तर न देता आयुक्तांनी आपल्याला गुंड म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर मनसेने आयुक्तांच्या दालनाबाहेर दीड तास ठिय्या आंदोलन केलं.
दरम्यान, आयुक्त नवल किशोर राम यांनी मनसेच्या काही नेत्यांशी चर्चा केली. पण या चर्चेनंतर देखील तोडगा निघाला नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्ते मात्र आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर सर्व मनसैनिकांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Pune Commissioner Bungalow Valuables Stolen : नेमकं काय प्रकरण?
चोरीच्या अनेक बातम्या आपण आत्तापर्यंत पाहिल्या आणि ऐकल्या असतील. मात्र आता चक्क पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात चोरी झाल्याचं समोर आलं आहे. पुण्याचे माजी आयुक्त राजेंद्र भोसलेंनी पदभार सोडल्यावर आयुक्तांच्या बंगल्यातील वस्तू गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे शासकीय निवासस्थानी सुरक्षा आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय?
सीसीटीव्ही नेमके काय कामाचे आहेत असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. राजेंद्र भोसले हे 31 मे रोजी महापालिका आयुक्त म्हणून निवृत्त झाले. मात्र मुलीच्या लग्नाचं कारण देत त्यांनी बंगला पुढचा एक महिना त्यांच्याकडेच ठेवला होता.
नवल किशोर राम यांनी राजेंद्र भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात अनेक गोष्टी नव्याने बसवण्याची वेळ महापालिकेच्या अभियंत्यांवर आली आहे. त्यासाठी नव्याने निविदा काढण्याची वेळ महापालकिकेवर आली. नवलकिशोर राम यांना याबाबत विचारले असता आपण येण्याआधी या बंगल्यात कोणत्या वस्तू होत्या याबद्दल आपल्याला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं. मात्र काही वस्तू नव्याने बसव्याव्या लागल्याचं त्यांनी मान्य केलं.
कामगारांचे काम बंद आंदोलन
पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या घटनेनंतर गुरुवारी महानगरपालिका कामगारांकडून काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मनसेच्या आंदोलनानंतर त्याचा निषेध म्हणून अभियंता संघाकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे.