पुणे: मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे राज्यासह देशभरात गाजत असताना, पुण्यातही वेगळं चित्र नसल्याचं दिसून येतंय. कारण पावसाळ्यापूर्वी म्हणजेच एप्रिल ते जूनदरम्यान पुण्याच्या रस्त्यांवर तब्बल 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र जुलै उलटण्यापूर्वीच रस्त्यांची चाळण झाल्याचं दिसून येतंय.



पुणे महापालिकेने रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी 12 फिरत्या गाड्या तयार केल्याचं महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितलं आहे, मात्र तरीही पुण्याच्या रस्त्यांवर खड्डे दिसत आहेत.

दरवर्षी रस्त्यांसाठी पुणे महापालिका शेकडो कोटी रुपये खर्च करते. शिवाय दुरुस्तीवर होणारा खर्च वेगळाच. मग हा सर्व पैसा जातो कुठे, हा प्रश्न पुणेकरांना सतावत आहे.



यावेळी रस्त्यांच्या खोदाईसाठी खाजगी कंपन्यांना अधिक वेळ देण्यात आला, त्यामुळे रस्त्यावरती जास्त खड्डे पडले आहेत, असं अजब उत्तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिलं.