पुणे:  पुण्यातील प्रकाश केळकरांनी तयार केलेलं मृत्यूपत्र वाचल्यानंतर, त्यांना कर्णाच्या वारसदारांचीच उपमा देणं योग्य ठरेल. कारण 73 वर्षांच्या या निवृत्त गृहस्थानं आपली आयुष्यभराची पुंजी सीमेवर लढणाऱ्या जवानांना आणि शेतात राबणाऱ्या बळीराजाला अर्पण केली आहे.

मुळचे अहमदनगरचे असलेले प्रकाश केळकर, टेक्स्टाईल मिल्सना कापूस पुरवण्याच्या उद्योगात होते. निवृत्ती घेतल्यानंतर आई-वडिलांच्या सेवेसाठी ते पत्नी दिपासह पुण्यात आले. मात्र, कामानिमित्त शेतकरी आणि जवानांचं आयुष्य जवळून पाहणाऱ्या प्रकाश केळकरांना स्वस्थ बसवेना.

एक दिवस त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा करुन थेट मृत्यूपत्र बनवलं. या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा 30 टक्के वाटा  सैनिकांना, 30 टक्के वाटा पंतप्रधान रिलिफ फंडाला आणि 30 टक्के वाटा हा मुख्यमंत्री निधीला वाटप केला आहे.

सीमेवर जवान आणि शिवारात किसान आहेत म्हणून आपण आहोत. मात्र, समाजाचं सर्वात जास्त दुलर्क्ष याच दोनं घटकांकडे होतं असल्याचं केळकर सांगतात. देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि लष्करांच्या जवानांसाठी काम करणारं सरकार अजूनपर्यंत तरी सत्तेत आलंच नाही, अशी खंतही केळकरांना सतत सतावते.

पण केळकर दाम्पत्याच्या या कृतीने त्यांच्या सारख्यांचे हात देशातल्या सर्वांना लाभले, तर जय जवान, जय किसानचा नारा खऱ्या अर्थानं सार्थ होईल, हे नक्की!