पुणे : "नांदेडमधील पोलिस भरती घोटाळ्याचा आरोपी प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा करा," अशी मागणी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केली. तसंच पोलिस भरती घोटाळ्याशी आणि प्रवीण भटकरशी माझा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

प्रवीण भटकर हा नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. त्याने ओएमआर नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली. या कंपनीमार्फत तो डाटा जमा करायचा आणि त्याचा वापर भरतीमध्ये घोटाळा करण्यासाठी करायचा, असा त्यांच्यावर आरोप आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भटकरच्या फसवणुकीचं जाळं संपूर्ण राज्यभरात पसरलेलं आहे.

"प्रवीण भटकर हा शास्त्रज्ञ विजय भटकर यांचा पुतण्या असल्याचा म्हटलं जात होतं. परंतु प्रवीण भटकरशी काहीही संबंध नसून त्याने माझ्या नावाचा उपयोग केला," असं विजय भटकर यांनी सांगितलं.

नांदेड पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार डॉ. विजय भटकरांचा पुतण्या?

धक्कादायक बातमी
एबीपी माझाशी बोलताना विजय भटकर म्हणाले की, "माझ्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. मला ह्याची काहीही कल्पना नव्हती. अमरावतीच्या मूर्तिजापूरमध्ये आमचं 300 लोकसंख्येचं छोटंसं गाव आहे. मी नेहमीच तिथे जात येत असतो. तिथे जवळपास सर्वच लोक भटकर आडनावाचे आहेत. प्रवीणचे वडील आणि मी चुलत-चुलत भाऊ आहोत. कारण आमच्या गावात सगळेच नात्यात आहेत. त्याचे वडील माझ्या गावात राहायचे. दूरच्या नात्याने तो माझा पुतण्या लागतो. तसं तर दूरच्या नात्याने सर्वच पुतणे लागतात. मला तिथे कोणीही काका, किंवा दादा बोलतात. तसंच हे नातं आहे. ह्या प्रकरणाशी आणि त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही."

त्याला कठोर शिक्षा करा!
दरम्यान डॉक्टर विजय भटकर यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या ईटीएच कंपनीत प्रवीण भटकर काम करायचा. "पुण्यात आल्यावर प्रवीण भटकर कधी ईटीएच कंपनीत रुजू झाला हे मलाही माहित नव्हतं. कंपनीत असताना तो स्कूल कम्प्युटरायझेशन आणि गव्हर्नमेंट कम्प्युटरायझेशनमध्ये काम करायचा. या प्रकरणात ईटीएच कंपनीचं नाव आल्यावर मी तिथे कॉल करुन विचारणा केली. पण त्यांनीही कंपनीचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं. प्रवीण भटकरने माझ्या नावाचा वापर केला. आठ-दहा वर्षात तो मला चार-पाच वेळा भेटला होता. पण अशी निंदनीय काम करणाऱ्या प्रवीण भटकरला पकडून त्याला कठोर शिक्षा करावी," असं विजय भटकर म्हणाले.

साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडमध्ये घोटाळा उघड

नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा
नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.

दोन पोलिस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 20 पैकी 12 आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पाहा व्हिडीओ