पुणे : पुण्यातील 'निर्भय बनो' (Pune Nirbhay bano) या कार्यक्रमाला जात असताना पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यावेळी झालेल्या गोंधळात (Nikhil wagle Car Attack) भाजपच्या कार्यकर्त्यांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप काही शरद पवार गटाच्या महिलांनी केला. पुण्यातील राष्ट्र सेवा दलमध्ये 9 फेब्रुवारीला 'निर्भय बनो' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झाला. कार्यक्रमावेळी महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची दखल राज्य महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही घटना पर्वती पोलीस (Parvati Police Station) ठाण्याच्या हद्दीत घडली त्या ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांना याबाबत माहिती विचारण्यात आली. निखिल वागळेंनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि हल्ला केला होता.
यासंदर्भात महिला आयोगाने ट्वीट केलं आहे. त्यात लिहिलंय की, काल पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या कार्यक्रमादरम्यान महिलांवर हल्ला झाल्याचे वृत्त माध्यमांद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पर्वती पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाडयांच्याकडून कालच या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, प्रथम दर्शनी जबाब तपासून योग्य ती कार्यवाही करत महिला आयोगाला अहवाल सादर करण्याचे निर्देश यांनी पोलिसांना दिले आहेत.
भाजप, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर अन् निखिल वागळेंवर गुन्हा दाखल
पुण्यात निखील वागळेंच्या गाडीवर झालेला हल्ला आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळाबद्दल पुण्यात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत. पहिला गुन्हा पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्याबद्दल भाजप आणि अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांसह पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुतण्यावर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक दत्ता सागरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांचा समावेश आहे. तर दुसरा गुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पत्रकार निखिल वागळेंवरदेखील दाखल करण्यात आला आहे पत्रकार निखिल वागळेंच्या कार्यक्रमास परवानगी नसल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कार्यक्रमाच्या ठिकाणी बेकायदा जमाव जमवून आंदोलन केल्याबद्दल महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.